हॉटेलची रूम बुक करताना आपण स्वच्छता आणि सोयीसुविधा यांना प्राधान्य देतो. मात्र या सगळ्यात प्रायव्हसीकडे अनेकदा दुर्लक्ष होते. अलीकडच्या काळात हॉटेलच्या रूम आणि बाथरूममध्ये छुपे कॅमेरे आढळल्याच्या घटना समोर येत आहेत. त्यामुळे स्वतःची आणि कुटुंबाची प्रायव्हसी सुरक्षित ठेवण्यासाठी सतर्क राहणे गरजेचे आहे. यासाठी महागड्या डिव्हाईसेसची गरज नाही; स्मार्टफोनचा कॅमेरा आणि फ्लॅशलाइट वापरून प्राथमिक तपासणी करता येते.
इन्फ्रारेड प्रकाशाने कॅमेरा कसा शोधायचा?
काही छुपे कॅमेरे अंधारात रेकॉर्ड करण्यासाठी इन्फ्रारेड प्रकाशाचा वापर करतात. हा प्रकाश मानवी डोळ्यांना दिसत नाही, परंतु काही स्मार्टफोन कॅमेरे तो ओळखू शकतात. सर्वप्रथम रूममधील सर्व लाइट्स बंद करा आणि पडदे ओढून घ्या, जेणेकरून रूममध्ये पूर्ण अंधार होईल. त्यानंतर स्मार्टफोनचा कॅमेरा चालू करून तो हळूहळू रूमभर फिरवा. फोनच्या स्क्रीनवर काही लहान, लुकलुकणारे दिवे दिसतात का, याकडे लक्ष द्या.
रूममधील एसी व्हेंट, टीव्ही, भिंतीवरील घड्याळ आणि इतर ठिकाणे काळजीपूर्वक तपासा, जिथे छोटा कॅमेरा लपवलेला असू शकतो. फोनच्या स्क्रीनवर लहान लाल, जांभळा किंवा पांढरा चमकणारा ठिपका दिसल्यास त्या ठिकाणी कॅमेरा किंवा इन्फ्रारेड लाईट असलेले उपकरण असू शकते. मात्र केवळ प्रकाश दिसल्याने तिथे छुपा कॅमेरा असेलच असे नाही.
सेल्फी कॅमेरा आणि टॉर्चची ट्रिक
ही पद्धत प्रत्येक स्मार्टफोनवर काम करेलच असे नाही. अनेक स्मार्टफोन कॅमेरे इन्फ्रारेड प्रकाश ओळखण्यास सक्षम नसतात. विशेषतः अनेक आयफोनच्या मागील कॅमेऱ्यांमध्ये IR फिल्टर असतात. त्यामुळे मागील कॅमेऱ्याने कोणताही प्रकाश दिसत नसेल, तर फ्रंट कॅमेरा किंवा सेल्फी कॅमेऱ्याने रूम स्कॅन करून पाहा.
स्मार्टफोनचा फ्लॅशलाइटही छुपा कॅमेरा लेन्स शोधायला मदत करू शकतो. रूममधील लाइट्स बंद करून फोनचा फ्लॅशलाइट चालू करा आणि एसी व्हेंट, घड्याळ, टीव्ही आणि इतर संशयास्पद भागांवर प्रकाश टाका. काचेसारख्या दिसणाऱ्या कोणत्याही लहान रिफ्लेक्शनकडे लक्ष द्या. कॅमेऱ्याची लेन्स असल्यास त्यावर टॉर्चचा प्रकाश टाकल्यावर ती चमकू शकते. हे रिफ्लेक्शन निळे किंवा पांढरे दिसू शकते. मात्र प्रत्येक चमकदार वस्तू कॅमेऱ्याची लेन्स नसते; रूममधील इतर काचेच्या पृष्ठभागांवरूनही असे रिफ्लेक्शन दिसू शकते.
सर्वच कॅमेरे इन्फ्रारेड प्रकाश वापरत नाहीत आणि प्रत्येक फोनचा कॅमेरा हा प्रकाश ओळखू शकत नाही. त्यामुळे स्मार्टफोनने 100 टक्के खात्री करता येत नाही. संशयास्पद ठिकाणी कॅमेरा असल्याचा दाट संशय असल्यास हॉटेल व्यवस्थापनाला कळवा आणि गरज भासल्यास पोलिसांशी संपर्क साधा. कोणतेही संशयास्पद डिव्हाईस स्वतः उघडणे किंवा त्याला हात लावणे टाळा.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply