राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या जिल्ह्यातच महाडायलिसिसची सेवा ठप्प झाली आहे. विशेष म्हणजे आरोग्यमंत्र्यांचं वास्तव्य असलेल्या गारगोटी शहरातील डायलिसिस केंद्रही बंद पडलं आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांवर उपचारांसाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे.
सरकारने मोठ्या गाजावाजात सुरू केलेल्या मोफत डायलिसिस सेवेचं तीनतेरा वाजलं असून, गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील सर्वसामान्य रुग्णांना मोफत आरोग्य सुविधा देण्यासाठी महाडायलिसिस, महालॅब आणि आपला दवाखाना या महत्त्वाकांक्षी योजना सुरू करण्यात आल्या होत्या. या सेवा पुरवणाऱ्या एचएलएल लाईफ केअर लिमिटेड कंपनीची राज्य सरकारकडे तब्बल १ हजार ६७ कोटी २५ लाख रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे कंपनीने राज्यभरातील सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
आर्थिक कोंडीचा फटका
राज्याच्या आरोग्य विभागाने एचएलएल लाईफ केअर लिमिटेड कंपनीसोबत दहा वर्षांचा करार केला होता. या करारानुसार गेल्या सात वर्षांपासून राज्यात सुमारे ४०० महालॅब, २२५ आपला दवाखाने आणि ११० डायलिसिस केंद्रांच्या माध्यमातून आरोग्य सेवा पुरविल्या जात होत्या. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून सरकारकडून देयकं मिळत नसल्याने कंपनीसमोर आर्थिक संकट निर्माण झालं आहे. आर्थिक कोंडीमुळे कंपनीच्या चार हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांचं वेतन रखडलं आहे. प्रयोगशाळांसाठी आवश्यक डायग्नोस्टिक किट्स, औषधं आणि अन्य साहित्य खरेदी करणंही कठीण झाल्याचं कंपनीकडून सांगण्यात आलं आहे.
रुग्णांच्या जीवाला धोका
डायलिसिस हा मूत्रपिंड निकामी झालेल्या रुग्णांसाठी नियमित आणि अत्यावश्यक उपचार आहे. आठवड्यातून ठराविक वेळा डायलिसिस करणं रुग्णांच्या जगण्यासाठी महत्त्वाचं असतं. अचानक सेवा बंद झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. खासगी रुग्णालयांमध्ये डायलिसिसचा खर्च परवडत नसल्याने सरकारी मोफत सेवेवर अवलंबून असलेल्या गरीब रुग्णांची अवस्था बिकट झाली आहे. वेळेत उपचार न मिळाल्यास त्यांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. कंपनीने थकीत देयकांबाबत सार्वजनिक आरोग्य विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला, मात्र अपेक्षित प्रतिसाद आणि निधी उपलब्ध न झाल्याने अखेर सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. या गंभीर प्रकाराबाबत आरोग्यमंत्र्यांच्या खाजगी सचिवांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी फोनला प्रतिसाद दिला नाही. त्यामुळे या प्रकरणावर आरोग्यमंत्र्यांची अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply