सणासुदीच्या काळातही महागाईचा भार कमी झालेला नाही. आता पुढील महिन्यात सर्वसामान्यांच्या खिशावरचा बोजा आणखी वाढण्याची शक्यता आहे. कांद्याचे भाव जवळपास दुप्पट झाले आहेत, तर कडधान्ये, तांदूळ आणि दुधाचे दरही वर सरकले आहेत. त्यात एल निनोच्या संकटामुळे परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अनेक ठिकाणी ओला दुष्काळ, तर काही ठिकाणी कोरडा दुष्काळ जाणवत आहे.
महागाईची आकडेवारी आणि आरबीआयची बैठक
ऑक्टोबर महिन्याची किरकोळ महागाईची आकडेवारी १२ नोव्हेंबरला जाहीर होणार आहे. सप्टेंबरमध्ये किरकोळ महागाईचा दर वार्षिक आधारावर ५.५४ टक्के होता. बँक ऑफ बडोदाच्या अर्थतज्ज्ञांच्या अंदाजानुसार ऑक्टोबरमध्ये हा दर ६ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. डिसेंबरमध्ये रिझर्व्ह बँकेच्या मॉनेटरी पॉलिसी कमिटीची बैठक होणार असून, त्यापूर्वी येणारी ही आकडेवारी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. व्याजदरांबाबत रिझर्व्ह बँक कठोर निर्णय घेते का आणि त्याचा गृहकर्जासह इतर कर्जांच्या हप्त्यांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कांदा दुप्पट, इतर वस्तूही महागल्या
बँक ऑफ बडोदाच्या अहवालानुसार ऑक्टोबरमध्ये २० अत्यावश्यक वस्तूंच्या किमतीत वार्षिक आधारावर ११.१ टक्क्यांची वाढ झाली. त्यापैकी १५ वस्तूंच्या महागाई दरात वाढ दिसली. नोव्हेंबरच्या पहिल्या आठ दिवसांतही या वस्तूंच्या किमतीत वार्षिक आधारावर ११.२ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. कांद्याच्या किमतीत सर्वाधिक वाढ झाली असून ऑक्टोबरमध्ये त्या गेल्या वर्षीच्या तुलनेत ९९.६ टक्क्यांनी अधिक होत्या. गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरमध्ये कांद्याच्या किमतीत ५१.२ टक्क्यांची घट झाली होती, हेही यामागील एक कारण आहे. तांदूळ, तूर डाळ, उडीद डाळ, दूध, गूळ आणि खाद्यतेलांच्या किमतीही वाढल्या आहेत. टोमॅटोच्या किमतीत वार्षिक आधारावर ६ टक्क्यांनी वाढ झाली, तर साखरेचे भाव ऑक्टोबरमध्ये मागील महिन्याच्या तुलनेत ४.५ टक्क्यांनी कमी होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply