दिवाळीचा शेवटचा सण भाऊबीज आज, ११ नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे प्रतीक असलेल्या या दिवशी बहीण आपल्या भावाचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची आणि सुख-समृद्धीची प्रार्थना करते. भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिचे प्रेमाने रक्षण करण्याचे वचन देतो. मात्र भावाचे औक्षण शुभ मुहूर्तावर करणे फलदायी मानले जाते.
भाऊबीज तिथी आणि शुभ मुहूर्त
पंचांगानुसार कार्तिक शुद्ध द्वितीया तिथी १० नोव्हेंबर रोजी दुपारी २ वाजता सुरू झाली असून ती ११ नोव्हेंबर रोजी दुपारी ३ वाजून ५३ मिनिटांनी संपेल. उदय तिथीनुसार आज भाऊबीज साजरी होईल. भाऊबीजेच्या ओवाळणीचा शुभ मुहूर्त दुपारी १ वाजून ३० मिनिटांपासून ते ३ वाजून ४६ मिनिटांपर्यंत आहे.
भाऊबीजचे महत्त्व
भाऊबीज हा सण भाऊ आणि बहिणीमधील अतूट प्रेम, विश्वास आणि जिव्हाळ्याचे नाते दर्शवतो. पौराणिक कथेनुसार या दिवशी यमराज आपल्या बहीण यमुनेच्या घरी गेले होते. यमुनेने त्यांचे औक्षण करून प्रेमाने स्वागत केले. तिच्या प्रेमाने प्रसन्न होऊन यमराजांनी तिला वरदान दिले. त्यामुळे या दिवसाला यमद्वितीया असेही म्हटले जाते.
पूजा आणि ओवाळणी विधी
सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे परिधान करावेत. घरातील देवांची पूजा करून दिवा आणि अगरबत्ती लावावी. पाटावर भावाला बसवून त्याच्या कपाळावर कुंकू आणि अक्षता लावाव्यात. भावाला नारळ आणि करदुडा द्यावा. त्यानंतर भावाचे औक्षण करून त्याच्या दीर्घायुष्याची प्रार्थना करावी. भाऊ मोठा असेल तर त्याच्या पाया पडून नमस्कार करावा. भावाला गोडधोड पदार्थ खाऊ घालावेत आणि भाऊ बहिणीला भेटवस्तू देऊन तिच्यावरील प्रेम व्यक्त करतो.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply