बॉलिवूडमध्ये सध्या नितेश तिवारी यांच्या ‘रामायण’ चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असलेल्या या बिग बजेट चित्रपटातील कलाकारांचे लूक, त्यांच्या भूमिका आणि व्हिज्युअल इफेक्ट्स याबद्दल प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. अशातच एका अभिनेत्याच्या ट्रान्सफॉर्मेशनने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ‘कहानी घर घर की’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेला अभिनेता चेतन हंसराज याने या चित्रपटात महत्त्वपूर्ण भूमिका साकारली आहे.
रावणाचे आजोबा राजा माली
चेतन हंसराज या चित्रपटात रावणाचे आजोबा म्हणजेच राजा माली यांची भूमिका साकारत आहे. त्याचा या भूमिकेतील लूक इतका वेगळा आहे की, त्याला ओळखणेही कठीण झाले आहे. चेतनने सोशल मीडियावर काही फोटो आणि व्हिडिओ शेअर करत राजा माली या भूमिकेसाठी केलेल्या मेहनतीची झलक दाखवली आहे. या भूमिकेसाठी त्याला दररोज जवळपास चार तास मेकअप चेअरवर बसावे लागत होते. प्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट व्हर्जिनिया होम्स आणि त्यांच्या टीमने प्रोस्थेटिक मेकअपच्या माध्यमातून त्याचा चेहरा पूर्णपणे बदलला. चेहऱ्यावर वेगवेगळे थर लावून रावणाच्या नानाचा प्राचीन लूक तयार करण्यात आला.
पडद्यामागची मेहनत
पडद्यावर काही मिनिटांसाठी दिसणाऱ्या या पात्रामागे कित्येक तासांची मेहनत आहे. चेतन हंसराज केवळ राजा मालीची भूमिका साकारत नाही, तर त्याने या चित्रपटासाठी आणखी सहा मोशन कॅप्चर भूमिकाही केल्या आहेत. यामध्ये रावणाच्या भावांपैकी एका पात्रासह एका राक्षसाचाही समावेश आहे. अभिनेता यशसोबत काम करण्याचा अनुभव खास असल्याचे त्याने सांगितले असून, राजा माली आणि रावण यांच्यातील दृश्ये प्रेक्षकांसाठी महत्त्वाची ठरतील असे त्याने म्हटले आहे. चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी व्हर्च्युअल प्रॉडक्शन म्हणजेच व्हॉल्यूम तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. ब्लू स्क्रीनसमोर अभिनय करताना आजूबाजूला प्रत्यक्ष वातावरण नसते, त्यामुळे कलाकाराला आपल्या कल्पनेत संपूर्ण प्रसंग उभा करावा लागतो आणि त्यानंतर व्हीएफएक्सच्या माध्यमातून तो पडद्यावर साकारला जातो. या भूमिकेसाठी हॉलिवूडचे प्रसिद्ध अॅक्शन आणि मूव्हमेंट कोच टेरी नोटरी यांनीही त्याच्या शारीरिक हालचालींवर काम केले. चेतनने या चित्रपटाला केवळ एक प्रोजेक्ट न मानता मोठी जबाबदारी असल्याचे म्हटले असून, रामायणाची कथा भारतातून जगभर पोहोचवण्याच्या प्रवासाचा भाग होता आल्याचा त्याला अभिमान आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply