तुर्कीच्या इजमिर प्रांतातील आलियागा भागात असलेल्या एका लोखंड आणि पोलाद कारखान्यात सोमवारी भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत तब्बल १६ कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून १३ जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण तुर्की देशात शोककळा पसरली आहे.
सोमवारचा दिवस तुर्कीसाठी अत्यंत वाईट ठरला. सकाळी सर्व कामगार रोजच्याप्रमाणे कामावर आले होते. आलियागा भागात असलेल्या मोठ्या लोखंड आणि पोलाद कारखान्यात अचानक एवढा मोठा स्फोट झाला की संपूर्ण परिसर हादरून गेला. अनेकांना सुरुवातीला तीव्र भूकंपाचा झटका आल्याचे भासले. लोक घरातून बाहेर पळाले आणि सगळीकडे आरडाओरडा सुरू झाला. स्फोटानंतर कारखान्यातून आगीचे मोठे लोट आणि काळा धूर पसरला.
नेमके काय घडले?
प्रांतीय गव्हर्नर सुलेमान एल्बान यांनी दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यात एका बॉयलर बदलण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान अचानक एक क्रेन भट्टीमध्ये कोसळली, ज्यामुळे तिथे भीषण स्फोट झाला आणि आग लागली. त्या दिवशी कारखान्यात नेहमीपेक्षा कमी लोक होते. रोज ३०० कामगार असतात, पण त्या दिवशी बॉयलरचे काम असल्याने फक्त २०० कामगार उपस्थित होते. जर ३०० कामगार असते तर मृतांचा आकडा आणखी मोठा असता, असे सांगितले जात आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती खूपच गंभीर असून मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.
चौकशीचे आदेश; पाच जण ताब्यात
या दुर्घटनेची गंभीर दखल घेत राष्ट्राध्यक्ष रजब तैयब एर्दोआन यांनी तात्काळ उच्चस्तरीय न्यायिक आणि प्रशासकीय चौकशीचे आदेश दिले आहेत. राष्ट्राध्यक्षांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर या भीषण दुर्घटनेची पुष्टी केली. या दुर्घटनेला नेमके कोण जबाबदार आहे आणि कुणाच्या हलगर्जीपणामुळे हा घात झाला, याचा कसून शोध घेतला जात आहे. न्यायमंत्री अकिन गुरलेक यांनी या प्रकरणाच्या तपासासाठी चार सरकारी वकिलांची नियुक्ती केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे. हे पाच जण कोण आहेत आणि त्यांची काय चूक होती, हे मात्र अद्याप बाहेर आलेले नाही.
जखमी कामगारांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून आपत्कालीन यंत्रणांकडून युद्धपातळीवर मदतकार्य राबवले जात आहे. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले. आग विझवायला खूप वेळ लागला, कारण धूर इतका होता की आत जाणेही अवघड झाले होते.
तुर्कीमध्ये आता सगळीकडे याच घटनेची चर्चा आहे. एवढ्या मोठ्या कारखान्यात सुरक्षेची काळजी का घेतली जात नाही, क्रेन कशी पडली आणि बॉयलर बदलताना सुरक्षा नियम पाळले होते का, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या सगळ्या प्रश्नांची उत्तरे तपासातून बाहेर येतील. मात्र अशा घटना पुन्हा होऊ नयेत म्हणून सरकारला कडक पावले उचलावी लागतील, अशी भावना व्यक्त होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply