घणसोली येथील दत्तनगर, नवशील नाका परिसरातील एका मोकळ्या भूखंडावर चालणाऱ्या लाकडाच्या वखारीला दुपारी दीड वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. वखारीत मोठ्या प्रमाणावर लाकूड साठवलेले असल्याने काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि संपूर्ण परिसरात धुराचे साम्राज्य पसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झालेली नाही.
ज्या भूखंडावर आग लागली, त्याच्या लगतच निवासी इमारती आणि झोपडपट्टी आहे. आगीच्या ज्वाला उंचावर उठत असल्याने आग शेजारील इमारतींपर्यंत पोहोचते की काय, या भीतीने स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली होती. दुपारी २ वाजून १० मिनिटांच्या सुमारास घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. कोपरखैरणे, ऐरोली आणि रबाळे एमआयडीसी अग्निशमन केंद्रांच्या एकूण पाच गाड्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम सुरू केले.
अनधिकृत वखारीवर कारवाईची मागणी
या दुर्घटनेनंतर परिसरातील अनधिकृत बांधकामांचा आणि वखारींचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. या अनधिकृत जागेला नेमका कोणाचा आशीर्वाद आहे, असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक विचारत आहेत. स्थानिक भाजप नगरसेवक गणेश सकपाळ यांनी प्रशासनावर निशाणा साधत म्हटले की, महानगरपालिका आणि सिडको प्रशासनाने अशा अनधिकृत भूखंडांवर तात्काळ कठोर कारवाई केली पाहिजे. आगीच्या ज्वाला लगतच्या इमारती व झोपडपट्टीपर्यंत पोहोचल्या असत्या तर मोठी जीवितहानी झाली असती. भविष्यात असा मोठा अपघात घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
दरम्यान, ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित अधिकाऱ्यांकडून घटनेची सखोल चौकशी सुरू आहे.
पनवेलमध्ये २४ तासांत आगीच्या २८ घटना
दरम्यान, पनवेल महानगरपालिका हद्दीत आणि परिसरात गेल्या २४ तासांत आगीच्या तब्बल २८ घटनांची नोंद झाली आहे. पनवेल महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाला ८ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजल्यापासून ९ नोव्हेंबर रोजी सकाळी आठ वाजेपर्यंत विविध ठिकाणांहून आगीबाबतचे कॉल प्राप्त झाले. या घटनांमध्ये कचरा, गवत, झाडे तसेच इमारती आणि इतर ठिकाणी आग लागल्याच्या प्रकारांचा समावेश आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply