दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत एक मोठी बातमी समोर आली आहे. पवन कल्याण आणि त्यांच्या पत्नी अण्णा कोनिडेला यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनी संयुक्त निवेदन जारी करत १३ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचा शेवट करत असल्याची घोषणा केली.
संयुक्त निवेदनात काय म्हटलं?
पवन कल्याण आणि अण्णा यांनी आपल्या जवळच्या मित्रांना आणि हितचिंतकांना उद्देशून संयुक्त निवेदन जारी केलं आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, आयुष्यातील महत्त्वपूर्ण काळ एकत्र घालवल्यानंतर त्यांनी परस्पर सामंजस्य आणि आदराने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्न संपुष्टात येत असलं तरी एकमेकांशी चांगले मित्र म्हणून संबंध कायम ठेवणार असल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच मुलांचे समर्पित पालक म्हणून दोघेही आपली जबाबदारी पार पाडतील. मुलांचा आनंद आणि त्यांचे हित हेच दोघांचे समान प्राधान्य असेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. या वैयक्तिक परिस्थितीत त्यांच्या गोपनीयतेचा आदर करण्याचं आवाहन त्यांनी चाहत्यांना आणि माध्यमांना केलं आहे. आतापर्यंत साथ देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत.
विभक्त होण्याची घोषणा समोर आल्यानंतर अण्णा कोनिडेलाने आपले इन्स्टाग्राम अकाउंट हटवल्याचं वृत्त आहे. यामुळे सोशल मीडियावर विविध चर्चांना सुरुवात झाली आहे. दोघांनी विभक्त होण्याची घोषणा केली असली तरी कायदेशीर घटस्फोटाची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती निवेदनात देण्यात आलेली नाही.
२०१३ मध्ये झालं होतं लग्न
पवन कल्याण आणि अण्णा लेझनेवा यांचा विवाह सप्टेंबर २०१३ मध्ये झाला होता. रशियन नागरिक असलेल्या अण्णा यांच्याशी पवन कल्याण यांनी हैदराबादमधील उपनोंदणी कार्यालयात विशेष विवाह कायद्यांतर्गत लग्न केलं होतं. या जोडप्याला दोन मुले आहेत. मुलीचं नाव पोलेना अंजना पवनोवा, तर मुलाचं नाव मार्क शंकर पवनोविच आहे.
पवन कल्याण यांचं हे तिसरं लग्न होतं. त्यांनी १९९७ मध्ये नंदिनी यांच्याशी पहिलं लग्न केलं होतं. मात्र, दोन वर्षांच्या आत दोघे विभक्त झाले आणि २००८ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २००९ मध्ये पवन कल्याण यांनी अभिनेत्री रेणू देसाई यांच्याशी लग्न केलं. मात्र, २०११ मध्ये ते वेगळे झाले आणि २०१२ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१३ मध्ये त्यांनी अण्णा लेझनेवा यांच्याशी तिसरं लग्न केलं होतं.
विशेष म्हणजे, याच वर्षी २ सप्टेंबर रोजी पवन कल्याण यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त अण्णाने सोशल मीडियावर त्यांच्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. या पोस्टमध्ये तिने पवन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना ते अनेकांच्या मनात, विचारांत आणि प्रार्थनांमध्ये असल्याचं म्हटलं होतं. तसेच लोकांच्या आयुष्यात त्यांनी दिलेल्या योगदानाचाही उल्लेख केला होता. त्यामुळे काही महिन्यांपूर्वीच एकमेकांसोबतचे खास क्षण शेअर करणाऱ्या या जोडप्याने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याची बातमी चाहत्यांसाठी अनपेक्षित ठरली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply