ऑस्ट्रेलियन क्रिकेटला हादरवून सोडणाऱ्या २०१८ मधील चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणात संपूर्ण संघाचा सहभाग असल्याचा दावा ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा याने केला आहे. त्याच्या या दाव्याला डेव्हिड वॉर्नरने पाठिंबा दिला आहे. या प्रकरणामुळे वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ आणि कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांच्यावर दीर्घकालीन बंदी घालण्यात आली होती.
ख्वाजा याने या सर्व प्रकरणाचा उल्लेख आपल्या आत्मचरित्रात केला आहे. लवकरच प्रकाशित होणाऱ्या ‘सब्र’ या पुस्तकातील काही उतारे प्रसिद्ध झाले आहेत. हे केवळ पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचे सांगण्यात येत असतानाच वॉर्नरने सोमवारी इन्स्टाग्रामवरील व्हिडिओमध्ये ख्वाजा यांच्या दाव्याला समर्थन दिले. ख्वाजा याने या प्रकरणात निलंबित करण्यात आलेले तीन खेळाडू संघासाठी बळीचे बकरे ठरल्याचे सूचित केले आहे.
वॉर्नरचा खुलासा
वॉर्नर म्हणाला की, ख्वाजा याने सांगितलेले १०० टक्के अचूक आहे. या विषयावर बोलून आठ वर्षे झाली आहेत. त्याने ख्वाजा यांना पूर्ण पाठिंबा असल्याचे सांगत, त्यांनी दाखवलेल्या धाडसाबद्दल आभार मानले. आता सर्वांना सत्य माहीत झाले आहे आणि ते समोर आले आहे. लोकांना ते जाणून घ्यायचे होते आणि ख्वाजा याने ते सांगितले, असेही वॉर्नर म्हणाला. त्या वेळी या प्रकरणाचा संघाला त्रास झाला होता, असेही त्याने नमूद केले.
वॉर्नरने सोमवारी २०१८ मधील चेंडू कुरतडण्याच्या प्रकरणाची ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने केलेली चौकशी घाईघाईत आणि सदोष असल्याचे म्हटले. जानेवारीत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या ख्वाजा याने सांगितले की, त्याने बालपणीचा मित्र असलेल्या वॉर्नरला सत्य सांगेन, असे वचन दिले होते.
आठ वर्षांनंतरची प्रतिक्रिया
ख्वाजा याने या प्रकरणाचे केलेले कथन ऑस्ट्रेलियात संमिश्र प्रतिक्रिया निर्माण करणारे ठरले आहे. आठ वर्षांनंतर का होईना, आपली बाजू मांडण्याच्या त्याच्या निर्णयाचे काहींनी समर्थन केले, तर काहींनी त्याच्या वेळेवर टीका केली. काहींनी हे सारे पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी केल्याचे म्हटले आहे.
२०१८ मध्ये केपटाऊन येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात चेंडूला सँडपेपरने घासून त्याला अनैसर्गिक पद्धतीने स्विंग मिळवण्याच्या कटात संपूर्ण संघ सहभागी होता, हे दावे क्रिकेट ऑस्ट्रेलिया, संघ व्यवस्थापन आणि इतर खेळाडूंनी गेली आठ वर्षे फेटाळले होते. त्या दिवशी सामन्यादरम्यान बॅनक्रॉफ्ट चेंडूवर सँडपेपर वापरत असल्याचे दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले होते. त्यानंतर ‘क्रिकेट ऑस्ट्रेलिया’ने बॅनक्रॉफ्टवर नऊ महिन्यांची बंदी घातली होती. त्या वेळी कसोटी संघाचा कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार वॉर्नरवर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून प्रत्येकी एक वर्षाची बंदी घालण्यात आली होती. दक्षिण आफ्रिकेतून मायदेशी परतल्यानंतर ऑस्ट्रेलियन जनतेची भावनिक माफी मागणाऱ्या या तिन्ही निलंबित खेळाडूंनी चौकशीबाबत सार्वजनिकरीत्या फार कमी भाष्य केले. स्मिथ आणि वॉर्नर यांनी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलियन संघात यशस्वी पुनरागमन केले होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply