मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या चर्चेत आहे. तिनं दिग्दर्शित केलेला ‘मैत्रेया’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमाच्या प्रमोशन निमित्तानं दिलेल्या मुलाखतींमध्ये क्रांती आणि तिचे पती समीर वानखेडे यांनी त्यांच्या आयुष्यातील खास किस्से शेअर केले आहेत. खरं तर क्रांती आणि समीर यांची मैत्री ही कॉलेजपासूनची. पण कॉलेजनंतर दोघांच्या करिअरच्या वाटा वेगळ्या झाल्या, त्यानंतर ते काही संपर्कात नव्हते. काही वर्षांनंतर अचानक भेट झाली आणि ती भेट एकमेकांच्या आयुष्याची सोबत करण्यापर्यंत पोहोचली.
## टॉमबॉय क्रांती आणि शिस्तप्रिय समीर
कॉलेजच्या दिवसांतल्या आठवणींबद्दल बोलताना क्रांती म्हणाली की, कॉलेजमध्ये असताना ते एकमेकांचा राग करायचे. क्रांती आणि समीर हे मुंबईच्या रुईया कॉलेजमध्ये एकत्र शिकत होते. क्रांतीनं एका मुलाखतीत सांगितलं की, ती कॉलेजमध्ये अगदी टॉमबॉयसारखी फिरायची, नाटकांच्या तालमीत व्यग्र असायची — थोडक्यात लेडी डॉनसारखा तिचा वावर असायचा. तर दुसरीकडे, समीर वानखेडे अत्यंत शांत आणि अभ्यासू होते. ते सतत अभ्यास करायचे. वर्गात ५० मुली आणि चार मुलं होती. त्यातही समीर अभ्यासू असल्याने क्रांतीला वाटायचं की, त्यांनीही आमच्या मस्तीत सहभागी व्हावं. तर समीर यांना क्रांतीला पाहून वाटायचं की, हिच्यासोबत लग्न कोण करणार?
## एअरपोर्टवर झाली पुन्हा भेट
कॉलेज संपल्यानंतर दोघांचे रस्ते पूर्णपणे वेगळे झाले. क्रांती अभिनयाच्या क्षेत्रात प्रसिद्ध झाली, तर समीर हे कस्टम्स / आयआरएस अधिकारी झाले. जवळपास ८ ते १० वर्षांनंतर नियतीनं दोघांना पुन्हा आमनेसामने आणलं. क्रांती एका दुबईतील पुरस्कार सोहळ्यावरून परतत असताना मुंबई विमानतळावर चेकिंगदरम्यान तिची बॅग कस्टम्स अधिकाऱ्यांनी थांबवली. क्रांती थोडी घाबरली होती. तिथं ड्युटीवर असलेल्या अधिकाऱ्याने बॅग तपासताना क्रांतीकडं पाहून विचारलं, मला ओळखलंस का? मी तुझ्या कॉलेजमध्ये होतो. क्रांतीनं सुरुवातीला ओळखलं नाही. पण जेव्हा तो अधिकारी हसला, तेव्हा त्याच्या गालावर पडणारी खळी पाहून क्रांतीनं ओळखलं की हा तर तोच कॉलेजमधील अभ्यासू समीर! समीर यांनी आपली ओळख ‘समीर वानखेडे, डेप्युटी कमिशनर’ अशी करून दिली. तेव्हा क्रांतीला वाटलं की, हा तर मोठा माणूस झालाय. क्रांतीच्या मित्रांनी तिला सल्ला दिला की असा अधिकारी मित्र कामाचा आहे, म्हणून त्याचा फोन नंबर घे. क्रांतीनंही मग निमित्त काढून समीर वानखेडेंचा नंबर घेतला.
## मैत्रीचं रूपांतर प्रेमात
विमानतळावर झालेल्या त्या भेटीनंतर दोघांमध्ये फोनवरून संभाषण सुरू झालं. हळूहळू मैत्री घट्ट झाली आणि एकमेकांचे स्वभाव समजल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला. २०१७ मध्ये त्यांनी अगदी साध्या पद्धतीनं लग्न केलं. आज हे दोघे आपल्या जुळ्या मुलींसोबत आनंदी आयुष्य जगत असून, प्रत्येक कठीण प्रसंगात क्रांती आपल्या पतीच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply