सातपुडा पर्वतरांगेत तब्बल साडेचार हजार फूट उंचीवर वसलेल्या श्री अस्तंबा ऋषींच्या यात्रेला यंदा भाविकांचा अलोट जनसागर लोटला आहे. गेल्या चार दिवसांत लाखो भाविकांनी अस्तंबा ऋषींचे दर्शन घेतले आहे. यंदा यात्रेने गर्दीचा विक्रम मोडला असून, संपूर्ण सातपुड्याचा परिसर भक्तिमय झाला आहे.
## दर्शनासाठी तासनतास रांगा
दिवाळीला धनत्रयोदशीपासून अस्तंबा ऋषींच्या यात्रेला प्रारंभ झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी बांधवांसह खानदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातून लाखो भाविक हजेरी लावतात. अस्तंबा ऋषींचे साडेचार हजार फूट उंचीवर असलेले हे शिखर सर करणे अत्यंत कठीण असून, ते शारीरिक कसोटी पाहणारे आहे. मात्र, श्रद्धाळू भक्तगण अडचणींवर मात करत हे शिखर गाठत असतात. वाढत्या गर्दीमुळे भाविकांना दर्शनासाठी तासनतास रांगेत उभे रहावे लागत आहे. यात्रेच्या पहिल्या दोनच दिवसांत लाखोच्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले आहे. यात्रेच्या आजवरच्या इतिहासातील ही सर्वाधिक गर्दी असून, सातपुडा पर्वतरांगांमध्ये चैतन्यमय आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
## मिरवणूक आणि विकासकामे
अस्तंबा ऋषींच्या यात्रोत्सवाला हजारो वर्षांची परंपरा आहे. येथे दर्शन घेऊन आदिवासी बांधव जल, जंगल आणि जमिनीच्या रक्षणासाठी साकडे घालतात. दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांचा आनंद द्विगुणित झालेला असतो. या यात्रेनिमित्त धडगाव शहरातून आदिवासी भाविकांनी पारंपरिक मिरवणूक काढली. मिरवणुकीत आदिवासी संस्कृतीचे अनोखे दर्शन घडले. काही भाविकांनी वेगवेगळ्या वेशभूषा करून लक्ष वेधून घेतले. डोक्यावर धान्याचा पवित्र कळस घेऊन आदिवासी बांधव मार्गस्थ होत होते. या यात्रेचे केवळ धार्मिकच नव्हे, तर निसर्ग संवर्धनातही महत्त्व आहे. दरम्यान, धडगाव तालुक्यातील मौजे अस्तंबा येथे विविध विकासकामांचे लोकार्पण आमदार आमश्या पाडवी यांच्याहस्ते झाले. नकट्यादेव रस्त्यावर आणि यात्रास्थळी दोन मोठे हायमास्ट उभारण्यात आले असून, ५२ सोलर स्ट्रीट लाइट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण नकट्यादेव रस्ता आणि अस्तंबा परिसर आता रात्रीच्या वेळीही उजळून निघणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply