एल निनोच्या प्रभावाने यंदा दुष्काळाचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक सभासद शेतकरी बांधवांनी आर्थिक आणि पाण्याचे वर्षभराचे नियोजन करावे, असे आवाहन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे यांनी केले.
कोपरगाव येथील सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यात दीपावली सणानिमित्त कोल्हे यांच्या हस्ते लक्ष्मी पूजन पार पडले. त्याप्रसंगी अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी शेतकऱ्यांनी दहा गुंठे क्षेत्रात पंचवीस मेट्रिक टन उत्पादन घेण्याचा प्रयत्न करावा, दैनंदिन खर्चात काटकसर करावी, सामाजिक भान ठेवावे आणि वंचित घटकांना दुष्काळात मदत करावी, तरच पुढची दिवाळी गोड होईल, असे प्रतिपादन केले.
संजीवनीचे मार्गक्रमण यशस्वी करू
माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा मूलमंत्र जपत ‘संजीवनी’चे मार्गक्रमण यशस्वी करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या दिशादर्शक नेतृत्वाखाली संजीवनीने अनेक संकटांचा यशस्वी मुकाबला केलेला आहे, असे ते म्हणाले.
साखरेच्या दरात तेजी आल्याने केंद्र व राज्य सरकारने थेट उसाच्या रसापासून इथेनॉल उत्पादन घेण्यावर बंदी आणली आहे. देशात सर्वप्रथम संजीवनीने बायो सीएनजी प्रकल्प सुरू केला. त्याच्यासमोर प्रेसमड व स्पेंटवॉशचा प्रश्न उभा राहिला आहे. दिवसेंदिवस एक एक नव-नवीन आव्हाने येत आहेत, असे त्यांनी सांगितले.
गाळप सुरू ठेवण्यासाठी उपाययोजना
गाळपातील समस्यांचे निराकरण करण्यासाठी रात्रंदिवस उपाययोजना सुरू आहेत. अधिकारी आणि कामगारांनी आपली जबाबदारी ओळखून कमीत कमी स्टॉपेजेस कसे होतील, यावर कटाक्ष ठेवावा. बॉयलिंग हाऊस सुधारणेतून उसाचे गाळप सुरू ठेवले आहे. कारखान्याला लागणारी स्टीम ३८ वरून ३६ टनांवर कशी आणता येईल, याचेही नियोजन दिले आहे, असे कोल्हे म्हणाले.
तालुक्यावर ज्या ज्या वेळी दुष्काळाचे संकट आले, त्याची तीव्रता कमी करण्यासाठी संजीवनी उद्योग समूहाने जबाबदारीने काम केले. मात्र त्यासाठी सर्वांची साथ महत्त्वाची आहे. काटकसरीचा मंत्र ठेवा, तरच पुढचे धोके कमी होतील, असेही ते शेवटी म्हणाले.
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सत्कार न स्वीकारता मदत करा, या आवाहनाला सर्वांनी चांगला प्रतिसाद दिला. त्यातून ६५ पोती धान्य जमा झाले आहे, असे कोल्हे यांनी यावेळी सांगितले. या प्रसंगी कार्यकारी संचालक हनुमंत करवर यांनी स्वागत केले. कारखान्याचे रोखपाल आर. टी. गवारे यांचा बक्षीस देऊन सन्मान करण्यात आला. संचालक, साखर सरव्यवस्थापक शिवाजीराव दिवटे, सचिव तुळशीराम कानवडे, कामगार, ऊस उत्पादक सभासद शेतकरी आणि ऊस वाहतूकदार आदी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply