कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून औद्योगिक आणि सामाजिक समस्यांवर नावीन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी मराठवाडा ॲक्सिलरेटर फॉर ग्रोथ ॲण्ड इन्क्युबेशन कौन्सिलतर्फे (मॅजिक) ‘एआयएमएम २०२६’ ही आठवी राष्ट्रीय नवकल्पना स्पर्धा होणार आहे. ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स फॉर मॅन्युफॅक्चरिंग ॲण्ड मॅनकाइंड’ अशी या स्पर्धेची संकल्पना आहे.
स्टार्टअप्स, नवउद्योजक, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग (एमएसएमई), विद्यार्थी आणि संशोधन पथकांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे. अर्ज करण्याची अंतिम मुदत ७ डिसेंबर आहे. उत्पादन क्षेत्र, उद्योग आणि समाजासमोरील प्रत्यक्ष समस्यांवर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने उपाय शोधणे, हा या स्पर्धेचा मुख्य उद्देश आहे.
दोन श्रेणी, सात लाखांची बक्षिसे
स्पर्धेसाठी दोन स्वतंत्र श्रेणी निश्चित करण्यात आल्या आहेत. पहिल्या श्रेणीत किमान व्यवहार्य उत्पादन (एमव्हीपी) टप्प्यातील संकल्पना आणि त्यांचे प्रूफ ऑफ कॉन्सेप्ट सादर करता येतील. दुसऱ्या श्रेणीत प्रत्यक्ष बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या आणि महसूल मिळविणाऱ्या उत्पादनांचा समावेश असेल.
या स्पर्धेतील विजेत्यांना एकूण सात लाख रुपयांची रोख पारितोषिके दिली जाणार आहेत. याशिवाय पात्र नवकल्पनांना बीजभांडवलासाठी मदत आणि मॅजिकच्या माध्यमातून इनक्युबेशनची संधी मिळणार आहे. त्यामुळे केवळ संकल्पना मांडण्यापुरते मर्यादित न राहता त्यांचे व्यावसायिक उत्पादन आणि बाजारपेठेतील विस्तार करण्यासाठीही नवउद्योजकांना मदत मिळू शकते.
असा करा अर्ज
इच्छुक स्टार्टअप्स, विद्यार्थी, संशोधक आणि एमएसएमईंना स्पर्धेसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. अर्जाची अंतिम मुदत ७ डिसेंबर २०२६ असून, अधिक माहितीसाठी आणि अर्जासाठी https://tinyurl.com/AIMM2026 या दुव्याचा वापर करता येईल. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर उद्योगांमध्ये वाढविणे, तंत्रज्ञानाधारित नवकल्पनांना प्रोत्साहन देणे आणि देशाच्या तांत्रिक व आर्थिक विकासाला हातभार लावणारे उपाय विकसित करणे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply