पिंपरी-चिंचवड शहरात दिवाळीच्या निमित्ताने विविध संस्था आणि संघटनांनी वेगवेगळे उपक्रम राबवले. सांगीतिक कार्यक्रम, काव्य पहाट आणि समाजातील वंचित घटकांचा सन्मान अशा उपक्रमांमुळे सणाचा आनंद अधिकच वाढला. शहरातील अनेक ठिकाणी नागरिकांनी या कार्यक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
काव्य पहाटेत कवींचा सहभाग
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेने निगडीतील शांता शेळके सभागृहात ‘दिवाळी काव्य पहाट’ या कवी संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमाला ज्येष्ठ साहित्यिक गिरीश प्रभुणे, महापालिकेचे उपायुक्त पंकज पाटील, शाखाध्यक्ष प्रा. राजन लाखे, उपाध्यक्ष डॉ. रजनी शेठ, पत्रकार विवेक इनामदार आणि नाना कांबळे उपस्थित होते. गणेश वंदना, स्वागत गीत आणि प्रश्नमंजुषेवर आधारित गीते भगवंत वलोकर, रिचा राजन आणि भूषण तोष्णीवाल यांनी सादर केली. प्राची देशपांडे, माधुरी मंगरूळकर, प्रतिमा काळ, शशिकला देवकर, अनघा पाठक, नीलिमा जोशी, कमल सोनजे, जयश्री श्रीखंडे, नरहरी वाघ, मीना शिंदे, दामोदर कुलकर्णी आणि ज्ञानेश्वर शिळवणे यांनी आपल्या रचना सादर केल्या. कामगार विषयावरील काव्यस्पर्धेतील विजेते डॉ. प्रसन्न टिळेकर, प्रदीप माने, डॉ. मीनल लाड, विनायक डेग्वेकर, प्रकाश परदेशी आणि प्रतिमा काळे यांचा पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला. ‘चालता बोलता आणि गाणी गप्पा’ या कार्यक्रमाने रंगत आणली, तर संजय जगताप यांनी सूत्रसंचालन केले.
कचरावेचक आणि वृत्तपत्र विक्रेत्या महिलांचा सन्मान
महापालिकेच्या घंटागाडीवरील कचरा संकलक महिला आणि वृत्तपत्र विक्रेत्या महिलांचा मानवी हक्क संरक्षण आणि जागृती संस्थेने सन्मान केला. प्रत्येक महिलेला दोन साड्या, जीवनावश्यक वस्तू आणि फराळ देण्यात आला. या वेळी संस्थेचे शहराध्यक्ष अण्णा जोगदंड, महिला शहराध्यक्षा संजना करंजावणे, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, उपाध्यक्ष काळुराम लांडगे, राजगुरुनगरचे अध्यक्ष शंकर नाणेकर, सामाजिक कार्यकर्ते सतीश हंचाटे, नीलेश हंचाटे, अरविंद मांगले, अलका लोंढे, जयश्री मोरे, जयश्री मस्के, राणू बिराजदार आणि आशा जाधव उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply