मध्य रेल्वेने गुरुवारी, ५ नोव्हेंबर रोजी स्थापनेची ७५ वर्षे पूर्ण केली. या ऐतिहासिक टप्प्यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ऐतिहासिक वारसा इमारतीत हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक राजीव श्रीवास्तव यांनी या उपक्रमाचे नेतृत्व केले. या माध्यमातून मध्य रेल्वेचा समृद्ध इतिहास, वास्तुकलेचा वारसा आणि भारतीय रेल्वेच्या विकासातील योगदान अधोरेखित करण्यात आले.
## रेल्वेची निर्मिती कशी झाली
मध्य रेल्वेची स्थापना ५ नोव्हेंबर १९५१ मध्ये झाली. ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वेचे निजाम स्टेट रेल्वे, सिंधिया स्टेट रेल्वे आणि धौलपूर स्टेट रेल्वे यांच्याशी विलीनीकरण करून मध्य रेल्वेची निर्मिती करण्यात आली. या प्रवासाची सुरुवात १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावलेल्या देशातील पहिल्या प्रवासी रेल्वेने झाली होती.
## उपनगरी सेवांचा विस्तार
मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या उपनगरी रेल्वे सेवांची संख्या १९५१ मध्ये ५१९ होती. २०२३ मध्ये ती मुंबई आणि पुणे मिळून १,८६० वर पोहोचली. यामध्ये मुंबईतील १,८२० आणि पुण्यातील ४० सेवांचा समावेश होता. मध्य रेल्वेकडून मेन, हार्बर, ट्रान्स हार्बर आणि उरण मार्गासह पुणे-लोणावळा विभागात उपनगरीय सेवा चालवल्या जातात. नऊ, १२ आणि १५ डब्यांच्या लोकलसह वातानुकूलित सेवांचाही विस्तार करण्यात आला आहे.
## विकासकामांना गती
आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मध्य रेल्वेने १०३.५८ किलोमीटरचे रेल्वे मार्ग कार्यान्वित केले. यामध्ये ७१.८४ किलोमीटर दुहेरीकरण आणि ३१.७४ किलोमीटर नवीन मार्गांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत एकूण १,१५७.१५ किलोमीटरचे रेल्वे मार्ग कार्यान्वित करण्यात आले आहेत. स्थानकांचा पुनर्विकास, लिफ्ट, सरकते जिने आणि डिजिटल सुविधांच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक चांगल्या सुविधा देण्यावर भर दिला जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply