लातूर शहरात लक्ष्मीपूजनाच्या रात्री फटाक्यांमुळे आगीच्या तब्बल आठ घटना घडल्या. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजल्यापासून शहराच्या विविध भागांत आतषबाजी सुरू झाली होती. त्यानंतर एकामागून एक आग लागल्याच्या घटना घडू लागल्या आणि अग्निशमन दलाची रात्रभर मोठी धावपळ झाली. या आगींमध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, वेळेवर मदत पोहोचल्यामुळे जीवितहानी टळली.
पहिली घटना रात्री साडेआठला
गंजगोलाई भागातील लोखंड गल्ली येथील विशाल पेंट या दुकानाला आग लागल्याची माहिती रात्री साडेआठच्या सुमारास अग्निशमन दलाला मिळाली. ही त्या रात्रीची पहिली घटना ठरली. त्यानंतर सुभाषनगर, संविधान चौक, गूळ मार्केटजवळील कचरा संकलन केंद्र आणि पाच नंबर चौकातील खुल्या जागेतील कचरा व टाकाऊ वस्तूंना आग लागली. आगीचा फैलाव रोखण्यासाठी अग्निशमन दलाची वाहने तातडीने घटनास्थळी दाखल झाली.
रात्री उशिरा ट्युशन एरिया परिसरातील कीर्ती गोल्डच्या गोदामाला तसेच एमआयडीसी परिसरातील डीलक्स फुटवेअर कंपनीला मोठी आग लागली. तिथली आग आटोक्यात आणण्याचे काम सुरू असतानाच अंबा हनुमान परिसरातील एका घराला आग लागल्याची माहिती मिळाली. प्रत्येक ठिकाणी मदत वेळेवर पोहोचवून अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले. रात्री उशिरापर्यंत दलाचे काम सुरू होते.
महापालिकेचे आवाहन
अग्निशमन अधिकारी बापूसाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने स्वतःच्या घरातील दिवाळीचा आनंद साजरा न करता रात्रभर घटनास्थळी काम केले. सोमवारी महापालिकेच्या अग्निशमन दलातर्फे नागरिकांना फटाके काळजीपूर्वक फोडण्याचे आवाहन करण्यात आले. फटाक्यांचा वापर करताना काळजी घेतली नाही, तर अशा दुर्घटना घडू शकतात, त्यामुळे सुरक्षिततेचे नियम पाळणे गरजेचे आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply