मुलाच्या जन्मानंतर आई आणि वडील दोघांनाही मुलाची काळजी घेण्यासाठी सुट्टी मिळणं गरजेचं असतं. पण भारतात आई आणि वडिलांना मिळणाऱ्या सुट्टीमध्ये मोठी तफावत असल्याचं एका नव्या अहवालातून समोर आलंय. या बाबतीत भारत जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. ग्लोबल हायरिंग आणि पेरोल प्लॅटफॉर्म Deel या कंपनीने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. अहवालाचे नाव ‘Generous Government Parental Leave Policies Don’t Guarantee Gender Equality’ असे आहे. या अहवालासाठी १२ प्रमुख देशांमधील जवळपास ५ हजार आई-वडिलांच्या माहितीचा अभ्यास करण्यात आला आहे.
या अहवालानुसार, भारतात बाळंतपणाची रजा संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत २५ टक्के महिला नोकरी सोडतात. तर पुरुषांमध्ये हे प्रमाण २० टक्के आहे. एकंदरीत जगभरातील आकडेवारी पाहिली तर हे प्रमाण भारतापेक्षा जास्त आहे. जगभरात ३० टक्के महिला आणि २३ टक्के पुरुष रजा संपल्यानंतर सहा महिन्यांच्या आत नोकरी सोडतात. या अभ्यासातून एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. अनेक देशांमध्ये आई-वडिलांसाठी रजेचे नियम कागदावर चांगले आणि समान दिसतात. पण प्रत्यक्षात या रजेचा फायदा महिला आणि पुरुषांना समान प्रमाणात मिळत नाही.
आईला १३० दिवसांची रजा, तर वडिलांना फक्त ७ दिवस
भारतात आईला सरासरी १३० कामकाजाचे दिवस म्हणजेच जवळपास २६ आठवड्यांची रजा मिळते. तर वडिलांना सरासरी फक्त ७ दिवसांची सुट्टी मिळते. आई आणि वडिलांच्या रजेतील या फरकाच्या बाबतीत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. या यादीत ब्रिटन पहिल्या क्रमांकावर आहे. त्याठिकाणी आई आणि वडिलांच्या रजेतील अंतर १९.५ पट आहे. तर भारतात हे अंतर १८.६ पट आहे. भारतात महिलांना मिळणारी ही रजा सरकारच्या मातृत्व लाभ कायद्यानुसार मिळणाऱ्या २६ आठवड्यांच्या रजेइतकी आहे. अहवालानुसार, भारतातील ९८.७ टक्के महिला आपली संपूर्ण रजा एकाच वेळी घेतात. १२ देशांमध्ये हे प्रमाण सर्वाधिक आहे. तर ८०.१ टक्के पुरुषही आपली रजा एकाच वेळी घेतात. महिलांना किती दिवसांची रजा मिळते हे त्यांच्या कंपनीवरही अवलंबून असल्याचं या अभ्यासात दिसून आलंय. मोठ्या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या महिलांना छोट्या कंपन्यांमधील महिलांच्या तुलनेत सरासरी ८० दिवस जास्त रजा मिळते.
वडिलांच्या सुट्टीचा निर्णय कंपन्यांवर अवलंबून
भारतात वडिलांना मुलाच्या जन्मानंतर किती दिवसांची रजा द्यायची हे प्रामुख्याने कंपनी ठरवते. कारण वडिलांना पालकत्वाची रजा देण्याबाबत कोणताही बंधनकारक कायदा नाही. त्यामुळे या अभ्यासात समावेश असलेल्या १२ देशांमध्ये भारतीय वडील सर्वात कमी दिवसांची रजा घेतात. इतर देशांमधील आकडेवारी पाहिली तर ब्रिटन आणि इटलीमध्ये वडील सरासरी १० दिवसांची रजा घेतात. कॅनडा आणि अमेरिकेत हे प्रमाण २८ दिवस आहे. तर स्वीडनमध्ये ६७ दिवस आणि स्पेनमध्ये ७० दिवसांची रजा घेतली जाते. म्हणजेच अमेरिकेतील वडील भारतीय वडिलांच्या तुलनेत चार पट जास्त दिवस सुट्टी घेतात.
जगभरात बाळंतपणाच्या रजेचा आर्थिक फटका महिलांनाच अधिक बसतो. ब्रिटनमध्ये चार महिन्यांपेक्षा जास्त काळ रजेवर राहणाऱ्या महिलांचा हातात येणारा पगार त्यांच्या नेहमीच्या पगाराच्या निम्म्यापेक्षाही कमी होतो. मुलाचा जन्म झाल्यानंतर महिला आणि पुरुषांच्या पगारातील फरक वाढू लागतो. हा फरक अनेक वर्षे कायम राहतो. अर्थशास्त्रात या परिस्थितीला ‘चाइल्ड पेनल्टी’ असं म्हटलं जातं. विविध क्षेत्रांमध्ये, नोकऱ्यांमध्ये आणि देशांमध्येही याचा परिणाम दिसून येतो. पालकत्वाच्या रजेतील असमानता हे या आर्थिक फरकाचं सुरुवातीचं एक कारण असल्याचं अहवालात म्हटलंय. काही अभ्यासांनुसार, वडिलांनी मुलाच्या संगोपनासाठी जास्त दिवसांची रजा घेतली तर पुढील काळात आईचं उत्पन्न वाढण्यास मदत होऊ शकते. या अभ्यासातील आकडे Deel या प्लॅटफॉर्मशी जोडलेल्या कर्मचाऱ्यांवर आधारित आहेत. त्यामुळे या आकडेवारीत ऑफिसमध्ये काम करणाऱ्या म्हणजेच व्हाइट कॉलर कर्मचाऱ्यांचं प्रमाण अधिक आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply