गोकुळ दूध संघाच्या सत्तासंघर्षावरून सुरू झालेला वाद आता न्यायालयीन लढाईसोबतच रस्त्यावरही पोहोचला आहे. या अध्यादेशाबाबत न्यायालयात काय निर्णय होतो आणि गोकुळच्या सत्तेचे गणित कोणाच्या बाजूने झुकते, याकडे संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
चार स्वीकृत सदस्यांवरून वाद
गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळावर चार स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरोधात काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. या निर्णयाचा निषेध करण्यासाठी आज, ९ नोव्हेंबर रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्यात आला. ऐतिहासिक दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या या मोर्चात समविचारी आघाडीचे नेते, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. हातात काळे झेंडे घेऊन नागरिकांनी सरकारच्या निर्णयाचा निषेध नोंदवला. कोल्हापुरातील वकिलांनीही या मोर्चाला पाठिंबा दिला आहे. मोर्चाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
तेरा विरुद्ध बारा जागांचा पेच
गोकुळच्या निवडणुकीत सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकल्या होत्या, तर महायुतीच्या पॅनेलला १२ जागा मिळाल्या होत्या. त्यामुळे समविचारी आघाडीला बहुमत मिळाले होते. मात्र, अध्यक्षपदाच्या निवडीवेळी महायुतीच्या १२ संचालकांनी अनुपस्थित राहिल्याने आवश्यक कोरम पूर्ण होऊ शकला नाही आणि अध्यक्ष निवडीचा पेच निर्माण झाला. त्यानंतर सतेज पाटील गटाने स्वतंत्र बैठक घेत शशिकांत पाटील चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड जाहीर केली. या निवडीवरूनही कायदेशीर वाद निर्माण झाला.
न्यायालयात आव्हान
सत्तेचा पेच सोडवण्याऐवजी राज्य सरकारने संचालक मंडळावर चार स्वीकृत सदस्य नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. या सदस्यांना मतदानाचा अधिकारही देण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीत १३ जागा मिळवलेल्या समविचारी आघाडीच्या बहुमतावर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सरकारचा हा निर्णय गोकुळचा ताबा मिळवण्यासाठी असल्याचा आरोप सतेज पाटील यांनी केला आहे. या अध्यादेशाला समविचारी आघाडीकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये आव्हान देण्यात आले आहे. सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावरची लढाई लढण्याचा निर्धार सतेज पाटील यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार आज संघर्ष मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply