कोल्हापुरात गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून निर्माण झालेला वाद आता रस्त्यावर उतरला आहे. अध्यक्ष निवडीसाठी समविचारी आघाडीला आवश्यक असलेला कोरम पूर्ण करता आला नाही. त्यामुळे शासनाने चार संचालकांची नियुक्ती केली. मात्र शासनाचा हा निर्णय आघाडीला मान्य नाही. या निर्णयाविरोधात आज सोमवारी कोल्हापुरात संघर्ष मोर्चा काढण्यात येणार आहे.
या मोर्चाचे नेतृत्व सतेज पाटील करणार आहेत. दसरा चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा जाणार आहे. शासनाने नेमलेल्या संचालकांच्या निवडीला विरोध करण्यासाठी हा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मोर्चात मोठ्या संख्येने दूध उत्पादक आणि कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.
मोर्चात म्हशींचा सहभाग
या मोर्चाचे सर्वात लक्षवेधी वैशिष्ट्य म्हणजे यात दूध देणाऱ्या म्हशीही सहभागी होणार आहेत. एका म्हशीच्या गळ्यात मला पण गोकुळवर संचालक म्हणून घ्या की असा बॅनर लावण्यात आला आहे. आणखी एका म्हशीच्या अंगावर गोकूळ वाचवा असा संदेश लिहिण्यात आला आहे. आंदोलक पायतान हातात घेऊन मोर्चात चालणार आहेत.
चार संचालकांवर आक्षेप
नेमण्यात आलेल्या चार संचालकांपैकी किती जणांकडे गायी किंवा म्हशी आहेत, असा सवाल एका म्हैस मालकाने केला आहे. आमची म्हैस पण म्हणते की मला संचालक म्हणून गोकुळवर घ्या, असे एका आंदोलकाने म्हटले आहे. दूध संघाच्या कारभारात दूध उत्पादकांचाच आवाज असावा, अशी आंदोलकांची मागणी आहे. या मोर्चाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply