येमेनमध्ये गेल्या दोन दिवसांत पुन्हा एकदा युद्ध तीव्र झाले आहे. सौदी अरेबियाने मोठा हल्ला चढवला असून हवाई हल्ल्यामध्ये महिला आणि लहान मुले दगावली आहेत. या हल्ल्यात 33 जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती समोर आली आहे, तर 39 जण गंभीर जखमी आहेत.
अल-शरिया भागात इमारतींचा चक्काचूर
हा भीषण हवाई हल्ला येमेनची राजधानी सनाच्या पूर्वेस असलेल्या अल-शरिया या शहरात झाला आहे. हूती माध्यमांच्या हवाल्याने मिळालेल्या माहितीनुसार शहरामधील अनेक इमारतींचा चक्काचूर झाला आहे. अनेकांचे मृतदेह मलब्याच्या ढिगाऱ्याखाली दबले आहेत. त्यातील काही मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर अनेकांचे मृतदेह आणखी काढले जात आहेत.
अस-मसरिया या वृत्तवाहिनीने हल्ल्यानंतरचे काही व्हिडीओ प्रसारित केले आहेत. या व्हिडीओंमधून तिथली भीषण परिस्थिती पाहायला मिळत आहे. बचाव पथकांकडून मृतदेह बाहेर काढले जात आहेत, तर जखमींना स्ट्रेचरवरून रुग्णालयामध्ये हलवले जात असल्याचे या व्हिडीओ क्लिप्समध्ये दिसून येत आहे.
आरोपांवर सौदी आघाडीकडून अद्याप स्पष्टीकरण नाही
हूती बंडखोरांनी सौदी अरेबियावर येमेनमधील नागरिकांवर हवाई हल्ले केल्याचा आरोप केला असून, याबद्दलचे वृत्त सबा या मीडिया संस्थेने दिले आहे. मात्र, सौदीच्या नेतृत्वाखालील लष्करी आघाडीने या आरोपांवर अद्यापपर्यंत कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही. हीच लष्करी आघाडी गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ येमेनच्या अधिकृत सरकारला पाठिंबा देत हूती बंडखोरांविरोधात लढत आहे.
येमेनमधील संघर्ष गेली अनेक वर्षे शांत होता, पण इराण युद्धानंतर हा संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. प्राप्त माहितीनुसार सौदीने हूतींच्या ताब्यातील सना विमानतळावर हल्ला केला होता. तिथे एका इराणी विमानाला उतरण्यास मज्जाव करण्यात आला आणि त्यानंतर दोन्ही बाजूंनी तणाव आणखी वाढला. त्यानंतर तेहरान समर्थित हूती बंडखोरांनी सौदी विमानतळाला लक्ष्य केले आणि प्रत्युत्तर दिले. पुढे लाल समुद्रात सौदीच्या जहाजांवरही हल्ले सुरू झाले. ही जहाजे सौदी तेल निर्यातीसाठी वापरतो. त्यामुळे हूती बंडखोर आणि सौदी समर्थित सैन्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर लढाई पुन्हा सुरू झाली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply