लक्ष्मीपूजनाच्या पार्श्वभूमीवर चाकण बाजारपेठेत झेंडूच्या फुलांच्या किमतींनी मोठी उसळी घेतली आहे. झेंडूचा भाव प्रतिकिलो २०० रुपयांवर पोहोचला असून, औद्योगिक वसाहतीतून फुले आणि हारांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे.
अहिल्यानगर आणि बुलढाणा जिल्ह्यांतून झेंडूची फुले चाकण बाजारात विक्रीसाठी आली आहेत. येत्या दोन दिवसांत भाव प्रतिकिलो चारशे रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता शेतकरी विक्रेत्यांनी वर्तवली आहे. दिवाळीत घरासमोर रांगोळी, दाराला झेंडूच्या फुलांचे तोरण, लक्ष्मीपूजनासाठी फुलांच्या माळा आणि देवघरातील सजावट यांना विशेष महत्त्व असते. त्यामुळे सणाच्या काळात झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असते. यंदाही चाकण बाजारपेठेत फुले खरेदी करण्यासाठी नागरिकांची आणि औद्योगिक वसाहतीतील कामगारांची मोठी गर्दी आहे. मात्र मागणीच्या तुलनेत फुलांची आवक दुष्काळामुळे कमी झाल्याने भाव वाढले आहेत.
हार आणि तोरणांचे भावही वाढले
लहान तसेच मोठे हार, तोरण आणि पूजेसाठी लागणाऱ्या फुलांच्या माळांचे भाव तीनशे, पाचशे ते एक ते दोन हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. घरगुती सजावट आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात फुले खरेदी करणाऱ्या नागरिकांना याचा फटका बसत आहे. कंपन्यांमध्येही सजावट आणि यंत्रांच्या पूजेसाठी फुले, हार आणि तोरणांची मोठ्या प्रमाणात खरेदी होत आहे.
एक हजार किलोहून अधिक फुलांची आवक
चाकण बाजारात एक हजार किलोहून अधिक झेंडूची फुले विक्रीसाठी आणली आहेत. औद्योगिक वसाहत आणि मोठी रहिवासी वस्ती असल्याने चाकण बाजारात झेंडूच्या फुलाला चांगला बाजारभाव मिळतो. सध्या दोनशे रुपये प्रतिकिलोने विक्री होत असून, दिवाळी पाडव्यामुळे भाव आणखी वाढतील, अशी आशा विक्रेत्यांना आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथील शेतकरी अंकुश देशमुख यांनी सांगितले की, यंदा दुष्काळामुळे फुलांचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. दिवाळीच्या सणामुळे फुलविक्रेत्यांच्या व्यवसायात तेजी आली असली तरी वाढलेल्या किमतींमुळे काही ग्राहक मर्यादित प्रमाणात खरेदी करत आहेत. सणासुदीच्या काळात फुलांचे भाव आणखी वाढणार का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply