दिवाळीच्या दिवसांत सगळीकडे आनंदाचे वातावरण असताना, ऊसतोड कामगारांचे आयुष्य मात्र वेगळ्याच वास्तवात जगले जाते. पोटाची सोय करण्यासाठी गाव सोडून बाहेर पडलेल्या या कामगारांना यंदाही सणाच्या काळात कुटुंबापासून दूर राहावे लागत आहे. हातात कोयता आणि डोक्यावर संसाराची जबाबदारी घेऊन ते सणासुदीच्या दिवसांतही शेतातच राबत आहेत.
दुष्काळामुळे गाव सोडावे लागले
मालेगाव शहराजवळील माळमाथा परिसरातील अनेक गावांमधून मोठ्या संख्येने कामगार ऊसतोडीसाठी स्थलांतरित झाले आहेत. यंदा दुष्काळी परिस्थिती असल्याने रोजगाराच्या शोधात अनेक कुटुंबांनी दसऱ्यापूर्वीच गाव सोडले. ऊसतोडीचा हंगाम सुरू झाल्यावर कामगारांचा दिवस पहाटेपासून सुरू होतो. दिवसभर ऊस तोडणे, त्याच्या मोळ्या बांधणे आणि वाहतुकीसाठी ऊस तयार करणे, यातच त्यांचा दिवस संपतो. अशा स्थितीत दिवाळीसाठी घरी परतणे अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे बहुतांश कुटुंबे ऊसतोडीच्या कोपीतच दिवाळी साजरी करतात.
हंगाम सहा महिने, पण यंदा लवकर परतावे लागणार
दुष्काळी परिस्थिती, शेतीतील अनिश्चित उत्पन्न आणि स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मर्यादित संधी यामुळे ऊसतोड कामगारांना स्थलांतराशिवाय दुसरा पर्याय राहत नाही. दरवर्षी सहा महिने ऊसतोडीचा हंगाम चालतो. यंदा पावसामुळे ऊस उत्पादन घटल्याने जानेवारीच्या आतच घरी परतावे लागणार आहे. कुटुंबापासून दूर राहून घाम गाळणाऱ्या या कामगारांच्या श्रमांमुळेच अनेकांच्या घरातील चूल पेटते. दिवाळीच्या प्रकाशात प्रत्येक घरात पणती तेवते, मात्र ऊसतोड कामगारांच्या आयुष्यात कष्टांची धग कायम राहते. गावाकडे दुष्काळ असल्याने ऊसतोड करून रोजीरोटी भागवावी लागत असल्याचे बोधे येथील कैलास वाघ यांनी सांगितले. आई-वडील गावाकडे असून, इच्छा असूनही पोटापुढे काही चालत नाही, त्यामुळे आमची दिवाळी इथेच असते, असे ते म्हणाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply