भारतातच नाही, तर जगभरात दिवाळी साजरी होते. शेजारील देश पाकिस्तानमध्येही दिवाळी धामधुमीने साजरी करण्यात येते. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी आणि पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हिंदू समुदायाला दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. दोन्ही नेत्यांनी अल्पसंख्याक समाजाच्या अधिकारांचे रक्षण आणि सामाजिक सलोख्यावर भर दिला.
दीपावळीच्या पर्वावर पाकिस्तानातील हिंदू समुदायाने मंदिरात पाठपूजा केली. दिवे आणि पणत्यांची आरास करण्यात आली. रेडिओ पाकिस्तानच्या वृत्तानुसार, झरदारी आणि शरीफ यांनी रविवारी स्वतंत्र संदेश देत देशात बंधुभाव आणि देशाच्या विकासात अल्पसंख्याक समुदायाचे मोठे योगदान असल्याचे म्हटले.
हिंदू समुदाय देशाचा अविभाज्य भाग
राष्ट्रपती झरदारी यांनी त्यांच्या संदेशात म्हटले की, धार्मिक अल्पसंख्याकांच्या अधिकारांचे रक्षण करण्याची जबाबदारी बहुसंख्य समाजाचीही आहे. पाकिस्तानातील हिंदू समुदाय हा राष्ट्रीय जीवनाचा अविभाज्य भाग आहे. शिक्षण, आरोग्य सेवा, व्यवसाय, लोकसेवा, समाजकल्याण, कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात हिंदू समुदायाचे योगदान मोठे असून पाकिस्तानला समृद्ध करण्यात हिंदूंचा मोलाचा वाटा आहे.
पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हिंदू समुदायाला देशाच्या सामाजिक जीवनाचा महत्त्वाचा धागा म्हटले. धर्म, श्रद्धा, रंग वा वर्ण भेदाविना देशातील नागरिकांना अधिकार, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा आणि धार्मिक स्वतंत्रता जपण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचे शरीफ यांनी सांगितले. दिवाळी हा सण द्वेष, असहिष्णुता आणि अंधारावर प्रकाशाच्या विजयाचे प्रतीक असून तो शांततापूर्ण जीवनाचा आणि भरभराटीचा संदेश देत असल्याचे दोन्ही नेत्यांनी म्हटले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply