दिवाळी म्हटलं की आनंद, उत्साह, फराळ, मिठाई आणि फटाक्यांची आतषबाजी आलीच. दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये अनेकजण कुटुंबासोबत सण साजरा करण्यासाठी गावाकडे जातात. त्यामुळे रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते. अशा वेळी अनेकजण नातेवाईकांसाठी मिठाई, भेटवस्तू आणि मुलांसाठी फटाके घेऊन प्रवास करतात. मात्र तुम्हीही रेल्वेने प्रवास करताना बॅगेत फटाके ठेवण्याचा विचार करत असाल, तर सावध व्हा. कारण रेल्वे प्रवासात फटाके घेऊन जाणं तुम्हाला महागात पडू शकतं.
फटाके नेण्यास मनाई का?
रेल्वे प्रवासात सुरक्षिततेला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं. फटाके हे ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थांच्या श्रेणीत येतात. त्यामुळे रेल्वेच्या नियमांनुसार प्रवासी डब्यांमध्ये असे पदार्थ घेऊन जाण्यास मनाई आहे. गर्दीच्या डब्यात फटाक्यांची पिशवी असणं अत्यंत धोकादायक ठरू शकतं. प्रवासादरम्यान घर्षण, उष्णता किंवा आगीच्या संपर्कामुळे फटाक्यांना आग लागण्याची शक्यता असते. अशी दुर्घटना घडल्यास केवळ संबंधित व्यक्तीलाच नाही, तर डब्यातील इतर प्रवाशांचाही जीव धोक्यात येऊ शकतो.
तपासणी आणि शिक्षा
ही बाब लक्षात घेऊन रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा दल प्रवाशांच्या सामानाची तपासणी करतात. स्थानकांवर तसेच रेल्वे गाड्यांमध्ये संशयास्पद वस्तूंवर विशेष लक्ष ठेवलं जातं. नियमांचं उल्लंघन करून फटाके किंवा इतर स्फोटक पदार्थ घेऊन जाणाऱ्यांवर कारवाई केली जाऊ शकते. रेल्वे कायद्यातील कलम १६४ नुसार, स्फोटक पदार्थ रेल्वेने घेऊन जाणं हा गुन्हा आहे. अशा प्रकरणात दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास, एक हजार रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. त्यामुळे दिवाळीसाठी गावी जाताना फटाके सोबत नेण्याचा मोह टाळा. आपल्या आनंदासाठी इतर प्रवाशांचा जीव धोक्यात घालू नका.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply