काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ‘बिलाँगिंग : अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र लिहिले आहे. या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपल्या राजकीय प्रवासाबद्दल आणि कुटुंबाबद्दल मनमोकळ्या गप्पा मारल्या.
राजकारणात येण्यास मुलांचा विरोध
राजकारणाचे जग, त्यातील महत्त्वाकांक्षा आणि लोभ, ढोंगीपणा आणि सत्तेच्या खेळासोबत अपरिहार्यपणे येणारी विश्वासघाताची वृत्ती याबद्दल आपल्याला तिटकारा होता, असे सोनिया गांधी यांनी सांगितले. आपण राजकारणात प्रवेश करू नये, असे आपली मुले राहुल आणि प्रियांका यांचे मत होते. त्यांनी यासंदर्भात आपल्याशी चर्चाही केली होती. त्यांना आपल्याला गमवायचे नव्हते, असेही त्या म्हणाल्या. १९९० च्या दशकाच्या उत्तरार्धात काँग्रेस पक्ष कठीण परिस्थितीतून जात असताना पती राजीव गांधी आणि सासूबाई इंदिरा गांधी यांची छायाचित्रे पाहताना आपल्याला वेदना आणि अपराधीपणाची भावना एकाच वेळी जाणवत असे. आपण स्वतःशीच संघर्ष करत होतो, असे त्यांनी सांगितले.
आणीबाणीवर काय म्हणाल्या?
आणीबाणीच्या संदर्भातही सोनिया गांधी यांनी आत्मचरित्रात लिहिले आहे. आणीबाणी लागू झाल्यानंतर नेमके काय घडत होते, याची खरी तीव्रता आपल्याला नंतर समजली, असे त्यांनी सांगितले. त्या काळात लोकशाही अधिकारांवर मर्यादा आणण्यात आल्या. बंदी प्रत्यक्षीकरणाचा अधिकारही निलंबित करण्यात आला. मात्र हे घटनात्मक प्रक्रियेनुसार करण्यात आले होते. देशात आणीबाणी लागू करण्याचा निर्णय ही चूक होती. आपल्या सासूबाई व तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनाही याची जाणीव झाली होती. त्या मनाने लोकशाहीवादी होत्या, असे आपल्याला वाटते, असे सोनिया गांधी यांनी म्हटले.
राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाबद्दल खुलासा
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झालेल्या दिवशीच राजीव गांधी यांना पंतप्रधानपदाची शपथ घेण्यास सांगण्यात आले होते. ही बातमी राजीव यांनी आपल्याला सांगितली, तेव्हा आपल्या हृदयात जणू कुणीतरी सुरा खुपसल्याची भावना झाल्याचे सोनिया गांधी यांनी मुलाखतीत म्हटले. राजीव गांधी यांनी पंतप्रधानपद स्वीकारल्यास त्यांच्याही जीवाला धोका निर्माण होईल, असे आपल्याला वाटत होते. त्यासाठीच त्यांना हा निर्णय घेऊ नये, अशी विनंती केली होती, असेही त्या म्हणाल्या. कर्तव्याची जाणीव आणि मनातील भीती यांच्यात होणाऱ्या संघर्षामुळे व्यथित झाल्याने आपण भगवद्गीतेचा आधार घेतला, असेही सोनिया यांनी मुलाखतीत सांगितले. ‘कर्माच्या फळाची अपेक्षा न ठेवता आपले धर्माचरण करा’, असे भगवान श्रीकृष्ण यांनी गीतेत सांगितले आहे. त्यातून आपल्या मनातील शंका आणि प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळाली होती. आपण कर्तव्याला महत्त्व दिले, असे त्या म्हणाल्या.
भाजपची टीका
दरम्यान, सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्रावर भाजपने टीका केली आहे. सोनिया गांधी यांचे आत्मचरित्र म्हणजे राजकीय वक्तव्यांचा भरणा व अप्रामाणिक हेतूने केलेल्या दाव्यांचे संकलन आहे, अशी टीका भाजपने शनिवारी केली. गेल्या १२ वर्षांत भारताने केलेली सर्वांगीण प्रगती पाहण्यासाठी आधी डोळ्यांवरून ‘इटालियन चष्मा’ उतरवावा, असे भाजपने म्हटले. काँग्रेसच्या सत्ताकाळातील विविध घोटाळे, १९८४ मधील शीखविरोधी दंगली आणि भोपाळ वायू दुर्घटनेबाबतही सोनिया गांधी यांनी आपल्या पुस्तकात लिहावे, असे आव्हान भाजपचे नेते तरुण चुघ यांनी दिले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply