महायुतीतील भाजप आणि शिंदे गट यांच्यातील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. नंदूरबारमध्ये स्वीकृत नगरसेवकाच्या निवडीवरून शिवसेनेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपवर केलेल्या टीकेमुळे दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत.
गेल्या काही महिन्यांपासून महायुतीतील भाजप आणि शिंदे गटात अंतर्गत वाद सुरू असल्याची चर्चा आहे. गेल्या आठवड्यात विधानपरिषदेच्या पाच पैकी केवळ दोन जागांवर महायुतीचे उमेदवार निवडून आले, तर तीन जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले. या पराभवाचे खापर भाजपने शिंदे गटावर फोडले होते. हा वाद शांत होत नाही, तोच भाजप आणि शिंदे गटात नव्या वादाची ठिणगी पडली आहे.
नेमका काय आहे वाद?
नंदूरबारमध्ये एका स्वीकृत नगरसेवकाने राजीनामा दिल्यानंतर नव्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू होती. मात्र कागदपत्रांतील त्रुटींमुळे भाजपने दिलेल्या उमेदवाराचा अर्ज प्रांत अधिकाऱ्यांनी बाद ठरवला. यावरून आमदार रघुवंशी यांनी भाजपवर निशाणा साधला.
नंदूरबार शहरात तब्बल एक लाख दहा हजार मतदार असताना, भाजपला स्वीकृत नगरसेवकपदासाठी एकही लायक आणि पात्र माणूस मिळू नये, याची लाज वाटते, असा खोचक टोला रघुवंशी यांनी लगावला. योग्य उमेदवार शोधण्यासाठी इतरांचे मार्गदर्शन घ्यायला पाहिजे होते, असेही ते म्हणाले. रघुवंशी यांच्या याच टीकेवरून महायुतीत वाद उफाळून आला आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीआधीच राजकीय फूट
नंदूरबार जिल्ह्यात आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील तीनही प्रमुख पक्ष — भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) — यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे.
महायुती म्हणून एकत्र निवडणुका लढवण्याऐवजी तिन्ही पक्षांचे स्थानिक नेते आपापल्या पक्षसंघटनेला बळ देण्यासाठी स्वबळावर ताकद आजमावण्याच्या पवित्र्यात आहेत. यामुळे जिल्ह्यात मैत्रीपूर्ण लढतीऐवजी तिरंगी किंवा चौकोनी संघर्ष होण्याची शक्यता बळावली आहे.
जिल्ह्यात मागील काळात पक्षाच्या माध्यमातून आणि शासनाच्या सहकार्याने झालेल्या विकासकामांच्या जोरावर स्वबळावर बहुमत मिळवू, असा ठाम विश्वास भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून व्यक्त केला जात आहे. दुसरीकडे, शिवसेना आणि राष्ट्रवादीनेही आपल्या पारंपरिक मतदारसंघांवर पकड मजबूत करण्यासाठी स्वतंत्र रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply