सध्या राज्यात दुष्काळ पडला आहे. राज्यातील ३०४ तालुक्यांमध्ये हा दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सरकार वेगवेगळ्या माध्यमातून मदत करत आहे. दिवाळी चांगली जावी यासाठी सरकारने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५००० रुपयांची अग्रीम रक्कम जमा केलेली आहे. आता याच रकमेवरून भाजपाचे नेते तथा मंत्री गिरीश महाजन यांनी महत्त्वाचं आवाहन केलं आहे. ज्या शेतकऱ्यांना या पैशांची गरज नसेल, त्या शेतकऱ्यांनी हे पैसे सरकारला परत करावेत, असं महाजन म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानाने आता वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे.
गिरीश महाजन नेमकं काय म्हणाले?
गिरीश महाजन आज (७ नोव्हेंबर) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. यावेळी माध्यम प्रतिनिधींशी बोलताना त्यांनी वरील विधान केलं. “पाच-पाच हजार रुपये सरकारने सर्वच शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. पण अनेक शेतकरी असे आहेत, ज्यांची आर्थिक स्थिती चांगली आहे. माझ्याकडे सकाळपासून ५० शेतकरी आले. माझ्याही खात्यात सरकारने पाठवलेले पैसे आलेले आहेत, पण मला हे पैसे परत करायचे आहेत, असं या शेतकऱ्यांचं मत आहे. मला या पैशांची आवश्यकता नाही. माझा शेतीपूरक व्यवसाय आहे,” असं महाजन म्हणाले. तसेच ज्या शेतकऱ्यांना ५००० रुपयांची गरज नसेल त्या शेतकऱ्यांनी हे पैसे परत करावेत, असं आवाहनही त्यांनी केलं.
महाजन स्वतःही पैसे परत करणार
विशेष म्हणजे मी स्वतःदेखील हे पैसे सरकारला परत करणार आहे, असं त्यांनी जाहीर केलं आहे. सध्या शेतकरी संकटात सापडला आहे. आर्थिक पातळीवर त्याच्यावर अनेक गंभीर प्रश्न उभे राहिले आहेत. अग्रीम ५००० रुपयांची शेतकऱ्यांना थोडीफार मदत होत आहे. अजूनही दुष्काळाची मुख्य मदत मिळालेली नाही. असे असताना गिरीश महाजन यांनी पैशांची गरज नसलेल्या शेतकऱ्यांना ५००० रुपये परत करा, असे आवाहन केलं आहे. त्यामुळे या आवाहनाला किती प्रतिसाद मिळणार, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाजनांच्या या आवाहनानंतर विरोधक आक्रमक होण्याची शक्यताही व्यक्त केली जात आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply