दुष्काळग्रस्त पात्र शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक दिलासा देण्यासाठी शासनाने प्रत्येकी पाच हजार रुपये दिवाळी अग्रीम देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार पाच नोव्हेंबर रोजी नंदुरबार जिल्ह्यातील एक लाख सात हजार पाचशे चौतीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५३ कोटी ७७ लाख रुपये जमा झाले आहेत.
उर्वरित शेतकऱ्यांनाही मदत मिळणार
उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही ही मदत देण्याची प्रक्रिया सुरू आहे. काही शेतकऱ्यांच्या खात्यात तांत्रिक अडचणींमुळे रक्कम जमा झालेली नाही. बँक खात्याशी संबंधित त्रुटी किंवा तपशिलातील चुकांमुळे काहींची मदत रखडली आहे. या अडचणी दूर करून त्यांनाही अग्रीम मदत दिली जाईल, अशी माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली.
राज्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन सणासुदीच्या काळात शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा, यासाठी शासनाने हा निर्णय घेतला. महसूल, मदत व पुनर्वसन आणि कृषी विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मदत वितरणाची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवून रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यावर भर दिला. त्यामुळे लाखो शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळाला आहे, असे मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले.
एकही पात्र शेतकरी वंचित राहणार नाही
दुष्काळग्रस्त एकही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी संबंधित यंत्रणांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी शासन कटिबद्ध असून दिवाळी अग्रीम मदतीच्या वितरणावर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. तांत्रिक अडचणी दूर झाल्यानंतर उर्वरित पात्र शेतकऱ्यांनाही मदत मिळणार असल्याचे मंत्री जाधव पाटील यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply