नाशिक शहरातील प्रसिद्ध चित्रकार प्रफुल्ल सावंत यांना अमेरिकेतील प्रतिष्ठित कॅमेरॉन आर्ट म्युझियम, विल्मिंटन, नॉर्थ कॅरोलिना येथे अमेरिकन चित्रकारांना जलरंग चित्रकलेचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शन करण्यासाठी तज्ज्ञ मार्गदर्शक म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. हे निमंत्रण मिळालेले ते पहिले भारतीय चित्रकार असल्याचे सांगण्यात येत आहे.
१७-१८ नोव्हेंबरला दोन दिवसीय कार्यशाळा
नॉर्थ कॅरोलिना राज्यातील विल्मिंटन येथे असलेले कॅमेरॉन आर्ट म्युझियम १९३८ मध्ये स्थापन झालेले प्रतिष्ठित कला संग्रहालय आहे. या उपक्रमांतर्गत सावंत १७ ते १८ नोव्हेंबरदरम्यान दोन दिवसीय कार्यशाळेत जलरंगातील विविध तंत्र, रंगसंगती, प्रकाश-छाया, वातावरणनिर्मिती आणि चित्ररचनेचे बारकावे शिकविणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या कलाप्रवासावर आणि जलरंगातील स्वतःच्या चित्रशैलीवर आधारित व्याख्यानही आयोजित करण्यात आले आहे. यानिमित्ताने त्यांच्या ३५ ते ४० निवडक जलरंग चित्रांचे प्रदर्शन होणार आहे.
पंधरा वर्षांपासून आंतरराष्ट्रीय ओळख
सावंत गेल्या पंधरा वर्षांपासून जगभरातील विविध देशांमध्ये भ्रमंती करीत असून त्यांच्या जलरंग चित्रशैलीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. हा सन्मान आपला वैयक्तिक गौरव नसून नाशिकच्या कला परंपरेचा आणि भारतीय जलरंग कलेचा जागतिक स्तरावर झालेला गौरव असल्याची भावना सावंत यांनी व्यक्त केली आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply