पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दोन्ही बाजूंना पसरलेली हिरवाई आता झपाट्याने कमी होत आहे. गेल्या दहा वर्षांत मार्गालगत मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने अनेक देशी आणि जंगली झाडे नष्ट झाली आहेत. वाहनांमधून निघणारे प्रदूषण कमी करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणारी नैसर्गिक हरितपट्टीच आता धोक्यात आली आहे.
१९९८ नंतर नैसर्गिकरित्या फुललेली हिरवाई
द्रुतगती मार्गाचे काम १९९८ मध्ये पूर्ण झाल्यानंतर मोकाट जनावरे आणि वन्यप्राणी रस्त्यावर येऊ नयेत, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने संपूर्ण ९४ किलोमीटर लांबीवर तारेचे संरक्षक कुंपण उभारले होते. त्यामुळे रस्त्यालगत प्राण्यांचा वावर कमी झाला. या परिसरात मुद्दाम वृक्षलागवड केली गेली नव्हती किंवा झाडांची विशेष जोपासना केली जात नव्हती; तरीही देशी, जंगली आणि विविध काटेरी झाडांची नैसर्गिक वाढ झाली. त्यामुळे संपूर्ण मार्गाच्या दुतर्फा हिरवीगार झाडे दिसू लागली होती आणि वाहनांमुळे निर्माण होणारे प्रदूषण कमी करण्यासही या झाडांची मदत होत होती.
जमिनींच्या व्यवहारांमुळे वृक्षतोडीला वेग
दरम्यान, गहुंजे ते कुसगावदरम्यान रस्त्यालगतच्या गावांमध्ये गुंठेवारी आणि जमिनींच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार वाढले. जमिनींच्या किमती गगनाला भिडल्या. द्रुतगती मार्गावरून आपल्या जमिनीचे ठिकाण आणि जाहिरात फलक सहज दिसावेत, या उद्देशाने काही जमीनधारक आणि खरेदीदारांनी रात्रीच्या वेळी वृक्षतोड सुरू केल्याचे सांगण्यात येते. गेल्या दहा वर्षांत झालेल्या या वृक्षतोडीमुळे मार्गालगतची नैसर्गिक हिरवाई मोठ्या प्रमाणात नष्ट झाली आहे.
वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनी सांगितले की, वाहनांमुळे होणारे हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी रस्त्यालगत वृक्षलागवड करणे गरजेचे आहे. वृक्षतोडीबाबत संबंधित विभागाने वनविभागाला माहिती दिल्यास किंवा तक्रार दाखल केल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply