महाराष्ट्राच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. शरद पवार रुग्णालयात असताना अजित पवार आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल त्यांना भेटायला गेले होते. दोघांमध्ये चर्चा सुरू असताना शरद पवार यांनी १० तारखेनंतर बोलू, असे सांगितले. त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार का, यावर विविध राजकीय तर्कवितर्क सुरू झाले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपकडून संजय राऊत यांना उत्तर देण्यात आले आहे.
## विलिनीकरणाचा निर्णय कोण घेणार?
भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण करायचे की नाही, याचा निर्णय सुनेत्रा पवार घेतील. सुनेत्रा पवार जो निर्णय घेतील, त्या निर्णयाला भाजपचे पूर्ण समर्थन असेल, असेही ते म्हणाले. शरद पवार स्वतःचा निर्णय घ्यायला सक्षम आहेत. शरद पवार आपला निर्णय संजय राऊत यांच्या माध्यमातून सांगणार नाहीत. एवढे सक्षम आणि ताकदवान नेते शरद पवार आहेत, असे नवनाथ बन म्हणाले. शरद पवार यांना निर्णय जाहीर करण्यासाठी संजय राऊत यांच्यासारख्या नेत्याची गरज नाही. शरद पवार स्वतः निर्णय घेतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
## राऊतांवर भाजपची टीका
संजय राऊत हे उद्धव ठाकरे गटाचे प्रतिपक्षप्रमुख आहेत, असे नवनाथ बन म्हणाले. उद्धव ठाकरे गटाचे जेवढे निर्णय उद्धव ठाकरे घेत नाहीत, तेवढे निर्णय संजय राऊत घेतात. त्यामुळे उद्धव ठाकरे पक्षाचे काँग्रेसमध्ये कधी विलिनीकरण करायचे, याचा निर्णय घेण्याचा अधिकार संजय राऊत यांना आहे, अशी टीका त्यांनी केली. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे पक्ष काँग्रेसमध्ये कधी विलीन करणार, दिवाळीत की डिसेंबरमध्ये, ते पंचांग पाहून सांगावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
पार्थ पवार राष्ट्रवादीच्या नेत्यांना किंमत देत नाहीत, असे संजय राऊत यांचे म्हणणे आहे. त्यावरही नवनाथ बन यांनी प्रत्युत्तर दिले. हाच न्याय लावायचा असेल, तर आदित्य ठाकरे संजय राऊत यांना किती किंमत देतात, असा सवाल त्यांनी केला. आदित्य ठाकरे संजय राऊत यांची कॉलर पकडतात आणि दोघांमध्ये हमरीतुमरी झाल्याच्या बातम्या माध्यमांतून महाराष्ट्राला कळल्या, असे ते म्हणाले. आदित्य ठाकरे यांना कंटाळून एकनाथ शिंदे बाहेर पडले आणि शिवसेनेचे ४० आमदार बाहेर पडले, असा दावा त्यांनी केला. संजय राऊत यांच्यावर आता काँग्रेसमध्ये जाण्याची वेळ आली आहे किंवा ते अख्खा उद्धव ठाकरे गट घेऊन काँग्रेसमध्ये जातील, असेही ते म्हणाले. पार्थ पवार यांच्यावर बोलण्यापेक्षा संजय राऊत यांनी आदित्य ठाकरे यांचा इतिहास पाहावा, असेही नवनाथ बन म्हणाले. आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत हा सामना अनेक वर्षांपासून पाहायला मिळत असल्याचा दावाही त्यांनी केला.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply