दीपोत्सवाला अवघा एक दिवस उरला असताना मालेगाव शहरातील बाजारपेठा रंगीबेरंगी आकाशकंदिलांनी सजल्या आहेत. शहर व परिसरात मोठ्या प्रमाणावर आकाशकंदिलांची रेलचेल असून यंदा दुष्काळाची झळ आणि सुमारे २० टक्के भाववाढीचा फटका जाणवत असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
नाशिक आणि मुंबईच्या धर्तीवर मालेगावातही विविध आकारांचे आणि कलात्मक नक्षीकाम केलेले कंदील विक्रीसाठी आले आहेत. पारंपरिक कंदिलांसह आधुनिक सजावटीच्या प्रकारांनी ग्राहकांचे लक्ष वेधले आहे. घरोघरी सजावटीची तयारी सुरू असून घराच्या प्रवेशद्वारापासून बाल्कनीपर्यंत आकाशकंदील लावण्याची लगबग दिसत आहे.
कंदिलांचे प्रकार आणि किंमती
शहरातील प्रमुख बाजारपेठांतील दुकानांमध्ये कागदी, कापडी आणि बांबूपासून तयार केलेले तसेच विविध रंगांच्या विद्युत रोषणाईने सजवलेले आकाशकंदील आकर्षक पद्धतीने मांडण्यात आले आहेत. तारा, षटकोन, गोलाकार, चौकोनी आणि मोराच्या आकारातील कंदील बाजारात उपलब्ध आहेत. आकर्षक झालरी, रंगीत कागद, कापडी सजावट आणि नक्षीकाम यामुळे कंदिलांचे सौंदर्य अधिकच खुलले आहे. काही कंदिलांवर राष्ट्रपुरुषांसह अलीकडच्या विविध आंदोलनांची चित्रेही दिसत आहेत. साधा आकाशकंदील १०० रुपयांना, डिजिटल कंदील १२५ ते २०० रुपयांना, मोठा सजावटीचा कंदील ३०० ते ५०० रुपयांना, एलईडी लाईटचा कंदील ४०० ते १००० रुपयांना आणि थ्रीडी डिझायनर कंदील ५०० ते १५०० रुपयांना मिळत आहे.
स्थानिक व्यावसायिकांकडून खरेदीचे आवाहन
दिवाळीचे आकाशकंदील आणि इतर साहित्य स्थानिक व्यावसायिकांकडूनच खरेदी करून त्यांना मदत करावी, असे आवाहन रामचंद्र हिरे यांनी केले आहे. स्थानिक व्यावसायिक उच्च शिक्षण घेऊन गावात व्यवसाय करतात आणि उधार उसनवारीची वेळ आली की तेच मदतीला येतात, ही भावना जपावी, असेही ते म्हणाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply