जळगाव शहरातील बालगंधर्व खुले नाट्यगृह येथे मराठी रंगभूमी दिनानिमित्त रंगभूमीवरील साहित्याचे पूजन, नटराज मूर्तीची पूजा, पारंपरिक नांदी गायन आणि नाटिकेचे सादरीकरण झाले. या वेळी नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी अडीच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती आमदार सुरेश भोळे (राजूमामा) यांनी दिली. नूतनीकरणानंतर नाट्यगृहाचे भाडे सर्वसामान्य रंगकर्मींना परवडणारे राहील, असे आश्वासन जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी दिले.
नांदी गायनाने सोहळ्याची सुरुवात
कार्यक्रमाच्या प्रारंभी जिल्हाधिकारी, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, आमदार सुरेश भोळे, नगरसेवक विष्णू भंगाळे, हर्षल मावळे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या सदस्या व नियामक मंडळ सदस्या गीतांजली ठाकरे यांच्यासह ज्येष्ठ रंगकर्मींच्या हस्ते रंगमंच, वाद्ये, नाट्यसंहिता, रंगपेटी आणि नटराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. ‘पंचतुंड नररुंडमालधर…’ या पारंपरिक नांदीचे गायन दुष्यंत जोशी, यश देशपांडे, खुशी बागूल आणि प्रणाली बाविस्कर यांनी केले. त्यांना तबल्यावर दर्शन गुजराथी यांनी साथसंगत केली. उपस्थित मान्यवरांनीही नांदी गायनात सहभाग घेतला.
रंगकर्मींच्या मागण्या
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात गीतांजली ठाकरे यांनी रंगभूमीच्या विकासासाठी आवश्यक सुविधांचा मुद्दा उपस्थित केला. जिल्हा नियोजन समितीच्या सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी असलेल्या दोन टक्के निधीतून बालगंधर्व खुले नाट्यगृहाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी रंगकर्मींच्या वतीने करण्यात आली.
या कार्यक्रमाला गीतांजली ठाकरे यांच्यासह चिंतामण पाटील, दुष्यंत जोशी, पीयूष रावळ, दीपक चांदोरकर, नितीन देशमुख, दीपक भट, रमेश भोळे, प्रदीप भोई, महेंद्र खेडकर, सुधीर भटकर यांच्यासह अनेक ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाट्यप्रेमी उपस्थित होते. रांगोळी सजावटीसाठी कुमुद नारखेडे यांचे सहकार्य लाभले. तुषार वाघुळदे आणि प्रा. राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन केले, तर आकाश बाविस्कर यांनी आभार मानले.
लेखक व दिग्दर्शक अमोल ठाकूर यांच्या ‘गाईड’ या छोटेखानी नाटिकेचे सादरीकरण करण्यात आले. शरद पांडे यांनी पद्यगायन करून कार्यक्रमात रंगत आणली. रंगभूमीशी नाते जपणाऱ्या ज्येष्ठ आणि नवोदित कलाकारांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला सांस्कृतिक स्वरूप प्राप्त झाले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply