मालेगाव तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांसाठी एकूण १११ पाणीटँकर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. आमदार स्थानिक विकास निधी, जिल्हा नियोजन आणि ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून शहर व तालुक्यातील गावांसाठी हे टँकर देण्यात आले. त्यांच्या लोकार्पणप्रसंगी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी संभाव्य दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी पिण्याचे पाणी, पशुधनासाठी चारा आणि ग्रामीण भागातील नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे सर्वंकष नियोजन करण्यात आल्याचे सांगितले.
पुढील दहा महिन्यांचे नियोजन
उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पुढील दहा महिन्यांचे नियोजन करावे, असे आवाहन मंत्री भुसे यांनी केले. जलतारा प्रकल्पाच्या माध्यमातून पावसाचे पाणी जमिनीत जिरवून भूजल पातळी वाढवण्यासाठी लोकसहभागातून प्रयत्न करावेत, असेही ते म्हणाले. आगामी काळात तापमान आणि बाष्पीभवन वाढण्याची शक्यता लक्षात घेता ऑगस्ट २०२७ पर्यंतच्या पाणी नियोजनाचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे त्यांनी स्पष्ट केले.
पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देऊन त्यानंतर उपलब्धतेनुसार शेतीसाठी पाणी देण्याचे नियोजन करावे, असे मंत्री भुसे यांनी सांगितले. धरण आणि नदीवरील लाभधारक शेतकऱ्यांनी एकत्रित चर्चा करून उपलब्ध पाण्याचे समन्यायी वाटप करण्याचा निर्णय घ्यावा. आवश्यकतेनुसार दोन-तीन पाणी आवर्तनांऐवजी एकच आवर्तन उपलब्ध होऊ शकते, याची जाणीव ठेवावी, असेही त्यांनी नमूद केले.
दुष्काळाला संधी मानून रोजगार
दुष्काळाच्या काळात नागरिकांच्या हाताला काम मिळणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे मंत्री भुसे यांनी सांगितले. १९७२ च्या दुष्काळात रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून पाझर तलाव, रस्ते आणि अन्य जलसंधारणाची कामे झाली होती. त्याच धर्तीवर यंदाच्या दुष्काळी परिस्थितीकडे आव्हान म्हणून पाहून सकारात्मक नियोजन करावे, असे आवाहन त्यांनी केले. गावांच्या भविष्यातील पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी पंचायत समितीच्या माध्यमातून आराखडे तयार करण्यात आले असून, ग्रामस्थांनीही त्यामध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असे ते म्हणाले. उपलब्ध पाण्याचा प्रत्येक थेंब जपून वापरणे, पाणीटंचाईच्या काळात परस्पर सहकार्य करणे आणि जलसंधारणाच्या कामांत लोकसहभाग वाढवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कार्यक्रमाला अपर जिल्हाधिकारी प्रवीण साळुंखे, उपविभागीय अधिकारी नितीन सदगीर, तहसीलदार विशाल सोनवणे, गटविकास अधिकारी सुनील धस यांच्यासह लोकप्रतिनिधी, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply