सोमाटणे येथे दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर मातीच्या वस्तूंना मोठी मागणी निर्माण झाली आहे. पणत्या, सैनिक, बाहुल्या, किल्ल्यांसाठीचे मावळे आणि इतर विविध मातीच्या वस्तू खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी वाढली असून, मूर्तिकारांच्या व्यवसायाला यंदा चांगले दिवस आले आहेत. दिवाळी येण्यापूर्वीच एकूण मूर्तींपैकी ७० टक्क्यांहून अधिक विक्री झाल्याने मूर्तिकारांमध्ये समाधानाचे वातावरण दिसून येत आहे.
हवामानाची साथ
यंदा पावसाने लवकर उघडीप दिल्याने मूर्तिकारांना मातीच्या मूर्ती, पणत्या, सैनिक आणि बाहुल्या तयार करण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला. ऑक्टोबर महिन्यात पावसाऐवजी कडक ऊन पडल्यामुळे मूर्ती वाळवण्याचे कामही जलद गतीने झाले. त्यामुळे कमी वेळात अधिक संख्येने मूर्ती तयार करणे शक्य झाले आणि विक्रीसाठी पुरेसा साठा उपलब्ध झाला.
किल्ल्यांसाठीच्या वस्तूंना मागणी
शालेय विद्यार्थ्यांमध्ये दिवाळीत किल्ले बनवण्याची परंपरा असून, यंदा किल्ले तयार करण्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्याने किल्ले बनवण्याचे प्रमाण वाढले आहे. किल्ल्यांसाठी लागणारे दिवे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्ती आणि मावळ्यांच्या प्रतिकृतींना मोठी मागणी आहे. त्यामुळे या वस्तूंची विक्रीही वाढली आहे.
गहुंजे येथील मूर्तिकार हनुमंत कुंभार यांनी सांगितले की, यंदा शेतकऱ्यांची भातकापणीची कामे लवकर पूर्ण झाल्याने त्यांनाही दिवाळीच्या खरेदीसाठी अधिक वेळ मिळाला. दिवाळीपूर्वीच नेहमीपेक्षा अधिक विक्री झाली आहे. माती, रंग आणि कच्च्या मालाच्या किमती वाढल्या असल्या, तरी मूर्तींच्या किमती स्थिर ठेवण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply