पुणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी योजनेतून भोर तालुक्यातील ६५५ अतितीव्र दिव्यांग लाभार्थ्यांना एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांचा निर्वाह भत्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला आहे. ही माहिती भोरचे गटविकास अधिकारी चंद्रकांत विपट यांनी गुरुवारी दिली.
सात महिन्यांचा भत्ता एकत्र
समाज कल्याण विभाग, पंचायत समिती भोर अंतर्गत भोर विकास गटातील सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात प्रती महिना ५०० रुपये प्रमाणे एप्रिल ते ऑक्टोबर २०२६ या सात महिन्यांच्या कालावधीचे प्रत्येकी एकूण ३ हजार ५०० रुपये प्रत्येक लाभार्थ्यांना मिळणार आहेत. भोर तालुक्यातील ६५५ पात्र लाभार्थ्यांना एकूण २२ लाख ९२ हजार ५०० रुपयांचे अनुदान पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यात थेट डीबीटी प्रणालीद्वारे जमा करण्यात आले आहे, अशी माहिती गटविकास अधिकारी विपट आणि प्रशासन अधिकारी मिलिंद खोपडे यांनी दिली.
दिवाळी गोड होणार
दुष्काळी परिस्थितीत शासनाकडून दिवाळीच्या काळात हे अनुदान मिळणार असल्याने दिव्यांग बांधवांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. आम्हा दिव्यांग बांधवांची दिवाळी गोड होणार आहे, असे भोर तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष बापू कुडले आणि पदाधिकारी यांनी सांगितले.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply