ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, पण अनेकांना आपल्याला हा त्रास असल्याची कल्पनाच नसल्याचे एका अभ्यासातून समोर आले आहे. महाराष्ट्रातील बार्शी येथे करण्यात आलेल्या या अभ्यासात ग्रामीण भागातील प्रत्येक तीनपैकी एका प्रौढ व्यक्तीला उच्च रक्तदाब असल्याचे आढळले. टाटा मेमोरियल सेंटरने जवळपास ४० हजार लोकांवर हा अभ्यास केला असून तो ‘एनपीजे कार्डिओव्हॅस्क्युलर हेल्थ’ या वैद्यकीय नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.
अभ्यासातून काय समोर आले
अभ्यासात सहभागी झालेल्या एकूण लोकांपैकी ३१ टक्के जणांना उच्च रक्तदाब असल्याचे आढळले. त्यापैकी केवळ ६ टक्के लोकांनाच आधीपासून आपल्याला हा त्रास असल्याची माहिती होती, तर तब्बल २५ टक्के लोकांना उच्च रक्तदाब असूनही त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. पुरुषांमध्ये या आजाराबाबत जागरूकता महिलांच्या तुलनेत कमी आढळली. केवळ १४ टक्के पुरुषांना आपल्याला उच्च रक्तदाब असल्याचे माहीत होते, तर महिलांमध्ये हे प्रमाण २१ टक्के होते.
२०१५ ते २०२० या काळात ‘इंडियन स्टडी ऑफ हेल्दी एजिंग’ अंतर्गत जमा झालेल्या आरोग्यविषयक माहितीचा संशोधकांनी अभ्यास केला. टाटा मेमोरियल सेंटरच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिऑलॉजी आणि ऑक्सफर्ड विद्यापीठातील संशोधकांनी मिळून हा अभ्यास केला. यात ३० ते ६९ वयोगटातील लोकांचा समावेश होता. सहभागींचा रक्तदाब, यापूर्वी उच्च रक्तदाबाचे निदान झाले होते का आणि त्यासाठी औषधे घेतली जात होती का, याची माहिती तपासण्यात आली.
वय वाढत जाईल तसा उच्च रक्तदाबाचा धोका वाढत असल्याचे अभ्यासात आढळले. हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित आजारांचा आधीपासून त्रास असलेल्या लोकांमध्ये उच्च रक्तदाबाचे प्रमाण ५० टक्क्यांपर्यंत होते.
औषधे घेऊनही नियंत्रण नाही
उच्च रक्तदाब असल्याची माहिती असलेल्या लोकांपैकी सुमारे ७३ टक्के जण औषधे घेत होते. मात्र औषधे घेऊनही त्यापैकी केवळ ३९ टक्के लोकांचाच रक्तदाब नियंत्रणात होता. म्हणजेच उपचार सुरू असूनही अनेकांचा रक्तदाब वाढलेलाच होता. त्यामुळे अशा लोकांना हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका वाढू शकतो.
वेळेवर तपासणी केल्यास हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि मूत्रपिंडांच्या दीर्घकालीन आजारांमुळे होणारे मृत्यू कमी करण्यास मदत होऊ शकते, असे या अभ्यासाचे वरिष्ठ लेखक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी सांगितले. तरुण वयातील अनेकांनाही उच्च रक्तदाब असल्याचे आढळणे ही चिंतेची बाब असल्याचे ऑक्सफर्ड पॉप्युलेशन हेल्थचे संशोधक बॅस्टियन बोहरमन यांनी म्हटले आहे. तरुण वयात निदान झाले नाही तर अनेक वर्षे उच्च रक्तदाबाचा त्रास राहू शकतो आणि पुढील आयुष्यात हृदयाशी संबंधित आजारांचा धोका वाढू शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले.
उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांनी नियमित औषधे घेणे, वेळोवेळी रक्तदाब तपासणे आणि डॉक्टरांच्या संपर्कात राहणे गरजेचे असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. ग्रामीण भागात उच्च रक्तदाबाची नियमित तपासणी होणे, आजाराचे लवकर निदान होणे आणि रुग्णांनी दीर्घकाळ उपचार सुरू ठेवणे आवश्यक आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply