आपल्या भारतीय परंपरेत धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या शुभ प्रसंगी सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. आज धनत्रयोदशीच्या दिवशी अनेक लोक सोने-चांदीचे दागिने किंवा नाणी खरेदी करतील. थोडं का असेना सोनं खरेदी करण्याची प्रथा आपल्याकडे पाळली जाते. मात्र, सोने खरेदी करताना केवळ धातूच्या किमतीवर लक्ष केंद्रित करणे पुरेसे नसते. सोन्याच्या मूळ किंमतीसोबत अतिरिक्त खर्चांचाही समावेश असतो आणि त्यामुळे एकूण किंमतीवर खूप मोठा परिणाम होतो. त्यामुळे दिवाळीत सोने खरेदी करताना बिलामध्ये समाविष्ट असलेल्या सर्व घटकांची काळजीपूर्वक तपासणी करावी.
१. सोन्याचा दर आणि कॅरेट तपासा
ज्वेलरी बिलामध्ये सर्वात मोठा भाग त्या दिवसाच्या सोन्याच्या किंमतीचा असतो. वेगवेगळ्या ज्वेलर्सकडे सोन्याच्या दरात थोडा फरक असू शकतो. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी प्रति ग्रॅम सोन्याचा त्या दिवसाचा दर नक्की तपासा. २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे दर वेगळे असतात, त्यामुळे तुम्ही खरेदी केलेलेच दर बिलात आहेत की नाही, हे जाणून घ्या.
२. मेकिंग चार्ज बघणेही महत्त्वाचे
सोन्याची कोणतीही ज्वेलरी खरेदी करताना त्यावर मेकिंग चार्ज अर्थात करणावळ द्यावी लागते. हा दागिने डिझाइन आणि तयार करण्याचा खर्च असतो. कधी हा दर प्रत्येक ग्रॅमप्रमाणे तर कधी सोन्याच्या किमतीच्या टक्केवारीप्रमाणे घेतला जातो. जेवढी डिझाईन किचकट तेवढा मेकिंग चार्ज जास्त असतो. त्यामुळे खरेदी करण्यापूर्वी मेकिंग चार्ज किती टक्के आहे किंवा किती रुपये प्रति ग्रॅम आहे, हे विचारा.
३. वेस्टेज चार्ज
काही वेळा ज्वेलर्स दागिने बनवताना सोने वाया जाण्याच्या नावाखाली वेगळा वेस्टेज चार्ज घेतात. अनेक ठिकाणी हा खर्च मेकिंग चार्जमध्येच समाविष्ट असतो. त्यामुळे एका खर्चासाठी तुम्हाला दोनदा पैसे द्यावे लागू नयेत, याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
४. बीआयएस हॉलमार्क आणि एचयूआयडी पाहणे गरजेचे
सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी बीआयएस हॉलमार्क खूप महत्त्वाचा आहे. दागिने खरेदी करताना त्यावर असलेला हॉलमार्क आणि एचयूआयडी क्रमांक नक्की तपासा. बिलातही सोन्याची शुद्धता आणि हॉलमार्कसंबंधी माहिती असावी. हॉलमार्किंगसाठी वेगळे शुल्क घेतले असेल तर त्याची माहितीही मागा. यामुळे ग्राहकाला सोन्याची शुद्धता आणि बिलात लागलेले शुल्क समजायला मदत होईल.
५. बिलातील जीएसटी
सोन्याच्या दागिन्यांच्या खरेदीवर ३ टक्के जीएसटी लागतो. त्यामुळे बिलात जीएसटीची गणना आणि त्याचा वेगळा उल्लेख नक्की पहा. कर बरोबर जोडलेला आहे की नाही आणि बिलात जीएसटीची रक्कम स्पष्टपणे दाखल केलेली आहे की नाही, हे तपासा. यामुळे एकूण पेमेंटची बरोबर माहिती मिळते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply