शुक्रवार, ६ नोव्हेंबर २०२६ ▶
वेगवान महाराष्ट्र महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या

सिन्नर प्रभाग १० : विस्तार वाढला, मूलभूत सुविधा मात्र मागे

सिन्नरमधील प्रभाग क्रमांक १० मधील उपनगरे झपाट्याने विस्तारली असली तरी रस्ते, पाणी आणि गटारींची सुविधा अजूनही अपुरी आहे. अस्वच्छतेमुळे डेंगीसारख्या आजारांचा धोका वाढला आहे.

सिन्नर प्रभाग १० : विस्तार वाढला, मूलभूत सुविधा मात्र मागे

सिन्नर महाविद्यालयापासून ते आश्विनाथ नगरापर्यंत, संजीवनी नगरापासून ते प्रकाशनगर, उद्योगभवन आणि अशोकापर्यंतचा चार किलोमीटरचा परिसर प्रभाग क्रमांक १० मध्ये येतो. प्रभागातील उपनगरे वाढली असली तरी मूलभूत सुविधांपासून ती अजूनही वंचित आहेत. काही उपनगरांत चालण्यासही धड रस्ते नाहीत, तर काही नगरांत पाण्याची सुविधा अपुरी आहे. गटारींचे तर नाव न घेतलेलेच बरे, अशी स्थिती आहे.

प्रकाशनगरचा परिसर दोन वर्षांपासून चांगलाच विस्तारित झाला आहे. या उपनगरात पाण्याची सुविधा अजून चांगली नाही. पाणी आले की वीज गायब, अशी अनेक वर्षांची समस्या अजूनही काही उपनगरांत सुटलेली नाही. त्यासाठी अजून तीन ट्रान्सफार्मरची गरज आहे. रस्ते आणि गटारी तर झालेल्याच नाहीत. संजीवनीनगर, उद्योगभवन, कर्पेनगर, द्वारकानगर, आश्विनाथनगर आणि वृंदावननगर या भागात गटारींची कामे बहुतांश अपुरी आहेत. कॉलनी रस्तेही नाहीत. त्यामुळे पावसाळ्यात या उपनगरांची अवस्था अतिशय वाईट होत असते.

उपनगरांचे आरोग्य धोक्यात

प्रभागातील या उपनगरांत सध्या डेंगी सदृश आजाराने नागरिक त्रस्त आहेत. पुरेशा पाणी पुरवठ्याचा अभाव असल्याने साठवणुकीच्या पाण्यामुळे डेंगीचा प्रभाव वाढता आहे. सांडपाण्याचीही व्यवस्था चांगली नसल्याने डासांचे प्रमाण जास्त आहे. घंटागाड्या वेळेत येत नाहीत. कचरा संकलन व्यवस्थित नसल्याने नागरिक इतरत्र कचरा फेकून देत असल्याने ब्लॅक स्पॉट तयार झाले आहेत.

प्रभागासाठीचे नियोजित प्रस्ताव

उपनगरांत गटारी आणि रस्ते काँक्रीटीकरण, तीन ट्रान्सफार्मर नव्याने बसविणे, चार ठिकाणच्या ओपन स्पेसवर नाना-नानी पार्क आणि कामगार वर्गासाठी कामगार भवनाची निर्मिती, असे प्रस्ताव प्रभागासाठी नियोजित आहेत.

विरोधी पक्षातील नगरसेवक असल्याने प्रभागाकडील प्रश्नांकडे नगर परिषदेचे दुर्लक्ष आहे, असे नगरसेवक अनिल सरवार म्हणाले. कामगार भवन उभारणीसह विविध प्रश्न सोडवण्यासाठी गिरीश महाजन यांच्या माध्यमातून प्रयत्न करत असल्याचे त्यांनी सांगितले. घंटागाड्या आणि सफाई कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे नगरसेवक आशा कर्पे यांनी सांगितले. नवीन उपनगरांत रस्ते आणि वीजेचे प्रश्न मांडले असून ते सोडवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू आहे.

ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा फेकला जातो. असे ब्लॅक स्पॉट आरोग्यासाठी धोकादायक आहेत. नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना गरजेच्या आहेत, असे उद्योगभवन येथील कुणाल माळी म्हणाले. द्वारकानगरात रस्ते चांगले नाहीत. कॉलनी रस्ते अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत आहेत. रस्त्यांचा विकास होणे गरजेचे असून त्याकडे नगर परिषदेने लक्ष द्यावे, अशी मागणी द्वारकानगर येथील विक्रम एखंडे यांनी केली.

स्रोत: मूळ बातमी

समृद्धी जगताप

Similar Posts

View All

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ही वेबसाइट AI सहाय्याने व्यवस्थापित केली जाते · This website is managed with AI assistance