सोलापूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि स्वराज्याच्या विचारांची आठवण जागविण्यासाठी १० नोव्हेंबर रोजी ३६७ वा शौर्य दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त छत्रपती शिवाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या वतीने ‘एक दिवा छत्रपतींसाठी’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. शिवप्रेमी आणि नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन शिवरायांच्या शौर्याला अभिवादन करावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.
प्रतापगडच्या पराक्रमाचे स्मरण
१० नोव्हेंबर १६५९ रोजी प्रतापगडाच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा सामना करून स्वराज्यावरील मोठे संकट परतवून लावले होते. या ऐतिहासिक पराक्रमाच्या स्मरणार्थ दरवर्षी शौर्य दिवस साजरा करण्यात येतो. यंदा या दिवसाचे ३६७ वे वर्ष असून सोलापुरात त्यानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
दिवा लावून अभिवादन करण्याचे आवाहन
या उपक्रमांतर्गत शिवप्रेमी आणि नागरिकांनी घरासमोर, अंगणात अथवा देवघरात एक दिवा प्रज्वलित करून शिवरायांच्या शौर्याला अभिवादन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. शिवरायांचे शौर्य, स्वाभिमान, स्त्रीसन्मान, सर्वधर्मसमभाव आणि लोककल्याणकारी विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहनही महामंडळाने केले आहे. या उपक्रमाबाबत पोलिस आयुक्तालयात निवेदन देण्यात आले. यावेळी दास शेळके, बाबा बाबरे, सतीश कुदळे, शेखर फंड, गणेश इंगळे, गणेश शिंदे, निरंजन नवगिरे, गणेश गवळी, निरंजन बोध्दूल आदी उपस्थित होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply