मुंबईतील नायर रुग्णालयाच्या सातही इमारतींमधील अग्निसुरक्षेतील त्रुटी दूर केल्या जाणार आहेत. रुग्णालयांमधील आगीच्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील महापालिका रुग्णालयांचे ऑडिट करण्यात आले होते. त्यामध्ये नायर रुग्णालयाच्या सातही इमारतींमध्ये अग्निसुरक्षेबाबत त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे या सातही इमारतींमध्ये प्रामुख्याने मॅन्युअल फायर अलार्म, कंट्रोल पॅनेल, बूस्टर पंप, स्प्रिंकलर प्रणाली आणि स्मोक डिटेक्टर लावण्यात येणार आहेत. थेट रुग्णांच्या जीविताशी निगडित असल्याने ही कामे तातडीने केली जाणार आहेत.
सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये आगीच्या दुर्घटना घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या अग्निशमन विभागाने विविध महापालिका रुग्णालयांची तपासणी केली. त्यात बहुतांश महापालिका रुग्णालयांमध्ये अग्निशमन यंत्रणा सुसज्ज नाही आणि काही ठिकाणी ती कार्यरत नाही, ही बाब समोर आली. या अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त यांच्या निर्देशानुसार महापालिका रुग्णालयांशी संबंधित अग्निशमन यंत्रणाची कामे सुलभरीत्या पार पाडण्यासाठी उपआयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली. आधीच्या बैठकांदरम्यान विविध रुग्णालयांमधील अग्निसुरक्षा यंत्रणांच्या त्रुटींची पूर्तता करण्यासाठी टप्प्याटप्प्याने आराखडा तयार करण्यात आला आणि टप्प्याटप्प्याने कामे पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
मुंबई महापालिकेच्या अग्निशमन विभागाने नायर रुग्णालय येथे फायर ऑडिट करून अहवाल तयार केला. नायर रुग्णालयाच्या आवारात एकूण सात इमारती असून अहवालानुसार सातही इमारतींमधील अग्निसुरक्षेबाबतच्या त्रुटींची पूर्तता तसेच पालन करण्याबाबत कळवण्यात आले आहे. त्यानुसार महापालिकेच्या यांत्रिक व विद्युत विभागाच्या वतीने नायर रुग्णालयात अग्निसुरक्षा उपायोजनांची अंमलबजावणी करण्यासाठी निविदा मागवण्यात आली आहे. यामध्ये ओमेक्स कंट्रोल सिस्टीम या कंपनीची निवड करण्यात आली असून यावर सुमारे १८ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. पुढील दोन वर्षांमध्ये हे काम पूर्ण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने नायर रुग्णालय फायरप्रूफ बनले जाणार आहे. ही कंपनी पुढील पाच वर्षे देखभाल करणार आहे.
२४ तास सुरू असलेली रुग्णसेवा
नायर रुग्णालयात दररोज वॉर्ड, अतिदक्षता विभाग, शस्त्रक्रिया विभाग आणि अपघात विभागामार्फत अविरतपणे रुग्णांना सेवा दिली जाते. हे विभाग २४ तास कार्यरत असतात, त्यामुळे रुग्णसेवेशी संबंधित विविध यंत्रे व संयंत्रे आणि उच्च विद्युत दाबावर चालणाऱ्या यंत्रांचा सतत वापर सुरू असतो. दैनंदिन स्तरावर या रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांची ये-जा सुरू असते, तसेच कार्यालयीन कामकाजाकरिता कर्मचाऱ्यांची उपस्थिती असते. फायर ऑडिट रिपोर्टच्या अहवालानुसार रुग्णालयामध्ये अग्निसुरक्षा प्रणाली बसवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply