धुळे शहरातील गजबजलेल्या साक्री रोड परिसरातील मोतीनाल्यावरील पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरू असताना बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास निर्माणाधीन पुलाचा स्लॅब कोसळला. घटनेवेळी स्लॅबच्या दुसऱ्या बाजूला मजूर काम करत असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र या घटनेमुळे चालू कामाच्या गुणवत्तेबाबत तीव्र असंतोष व्यक्त केला जात असून कंत्राटदारावर कठोर कारवाईची मागणी केली जात आहे.
साक्री रोडवरील वाढत्या वाहतुकीची कोंडी लक्षात घेता तत्कालीन आमदारांच्या पुढाकाराने मोतीनाला पुलाच्या रुंदीकरणासाठी निधी मंजूर करण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून दोन रुग्णालयांच्या वॉल कंपाऊंडदरम्यान या विस्तारीकरणाचे काम वेगाने सुरू आहे.
महापौरांकडून पाहणी
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत महापौर मायादेवी परदेशी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांनी घटनास्थळी पाहणी केली. निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत महापौरांनी तीव्र संताप व्यक्त करत धुळेकरांच्या जिवाशी असा खेळ सुरू असेल तर तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा दिला. दोषी कंत्राटदारावर कडक कारवाई करण्याचे निर्देश कार्यकारी अभियंत्यांना दिले.
स्लॅब का कोसळला
कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले की मोतीनाल्यावरील ८ मीटर रुंदीच्या जुन्या पुलाचे १८ मीटर रुंदीकरण करण्याचे काम प्रगतीत आहे; दोन्ही बाजूंना प्रत्येकी ५ मीटरने पूल रुंद केला जात आहे. कंत्राटदाराने ३१ ऑक्टोबरला पहिल्या गाळ्याचे काँक्रीटीकरण केले होते. मात्र काँक्रीटीकरण सुरू असताना बुधवारी सेंटरींगचा सपोर्ट जागेवरून हलल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून कंत्राटदाराने स्वतःहून सर्व सेंटरींग काढून नवीन करण्यासाठी ओल्या काँक्रीटसह सेंटरींग पाडून काढले. हा प्रकार केवळ सेंटरींगचा सपोर्ट हलल्याने घडला असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply