दिपावली उत्सव-२०२६ दरम्यान नाशिक शहरातील मध्यवर्ती बाजारपेठ भागातून जाणाऱ्या सिटीलिंक बसेसच्या वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. पोलीस उप आयुक्त (मुख्यालय/वाहतूक) चंद्रकांत गवळी यांनी याबाबतची वाहतूक नियंत्रण अधिसूचना ४ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित केली आहे.
दिपावली उत्सवाच्या खरेदी-विक्री निमित्ताने शहरातील मध्यवर्ती बाजारपेठेत रविवार कारंजा, सांगलीबँक सिग्नल, अशोकस्तंभ, शालीमार, मेनरोड, दहीपुल, नेपाळी कॉर्नर या ठिकाणी नागरिक, व्यवसायिक व त्यांच्या वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. त्यामुळे सिटीलिंक बसेसचा बाजारपेठ परिसरातील मार्ग पंचवटी कारंजा – आर. के. – सांगली बँक सिग्नल – शालीमार यामध्ये बदल करून सदर बसेसची वाहतूक दिवाळी उत्सव दरम्यान पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्याचे अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
प्रवेश बंद मार्ग
दिंडोरी नाका (निमाणी) – मालेगाव स्टॅण्ड कडून सीबीएस, शालीमार कडे येणाऱ्या व जाणाऱ्या शहर वाहतूक सेवेच्या सिटीलिंक बसेस व मोठी वाहने यांना पंचवटी कारंजा ते – रविवार कारंजा – सांगली बँक सिग्नल – नेपाळी कॉर्नर – शालीमार या मार्गावर वाहतुकीस प्रवेश बंद करण्यात येत आहे.
पर्यायी मार्ग
१) दिंडोरी नाका (निमाणी) मार्गे सीबीएस कडे येणाऱ्या-जाणाऱ्या सिटीलिंक बसेस: दिंडोरी नाका – पेठ फाटा – मखमलाबाद नाका – बायजाबाई छावणी – अशोकस्तंभ – सिध्देश्वर मंदिर – रामवाडी – मखमलाबाद नाका – पेठफाटा मार्गे इतरत्र जातील.
२) सीबीएस कडून पंचवटी कडे जाणाऱ्या सिटीलिंक बसेस: अशोकस्तंभ चौपडा लॉन्स – जुना गंगापुरनाका – चौपडा लॉन्स – बायजाबाई छावणी – मखमलाबाद नाका – पेठ फाटा – दिंडोरी नाका मार्गे इतरत्र जातील.
३) दिंडोरी नाका (निमाणी) येथून नाशिकरोड, अंबड जाणाऱ्या बसेस: सिटीलिंक बसेस काट्या मारूती सिग्नल – संतोष टी पॉईंट – कन्नमवार पुल – द्वारका सर्कल – मुंबईनाका सर्कल मार्गे नाशिक, नाशिकरोड, अंबड, सातपूर व इतरत्र जातील.
कालावधी व वेळ
सदरील अधिसूचना ५ नोव्हेंबर २०२६ पासून अंमलात येणार असून ५ नोव्हेंबर २०२६ ते ११ नोव्हेंबर २०२६ पावेतो दररोज सकाळी १०.०० ते रात्री १०.०० वाजेपावेतो अंमलात राहणार आहे. वर नमूद मार्गांत व वेळेत परिस्थितीनुसार ऐनवेळी कोणतीही पूर्वसूचना न-देता बदल करण्याचे अधिकार राखून ठेवण्यात आलेले आहेत.
वरील सर्व प्रकारचे निर्बंध हे पोलीस सेवेकरीता असलेली वाहने, अग्निशमन दलाची वाहने, शववाहिका, रुग्णवाहिका, तसेच अत्यावश्यक व आपत्कालीन सेवेची वाहने यांना लागू राहणार नाहीत. अधिसूचनेचे उल्लंघन करणाऱ्यांवर मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ११९/१७७, १२२/१७७, १५(२)(१०) प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही अधिसूचनेत नमूद करण्यात आले आहे.
Leave a Reply