उरण तालुक्याच्या पूर्व आणि पश्चिम भागांना जोडणाऱ्या खोपटा पुलाच्या प्रतीक्षेला अखेर पूर्णविराम मिळणार आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून दुरुस्तीसाठी बंद असलेल्या या पुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, काँक्रीट पूर्णपणे सेट झाल्यानंतर दिवाळीत हा पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे पर्यायी मार्गांवरून लांबचा वळसा घालणाऱ्या उरणकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे.
१९९५ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या संकल्पनेतून हा पूल उभारण्यात आला होता. गेल्या काही वर्षांत या मार्गावर अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढल्याने पुलाच्या संरचनेवर ताण निर्माण झाला होता. सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या संरचनात्मक तपासणीत पुलाच्या अंतर्गत भागात मोठ्या प्रमाणात तडे गेल्याचे आणि बेअरिंग्ज खराब झाल्याचे आढळले. त्यानंतर पुलाची दुरुस्ती आणि मजबुतीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला.
आधुनिक तंत्रज्ञानाने दुरुस्ती
या दुरुस्तीचे काम तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक ठरले. पुलाच्या बांधकामावेळी वापरण्यात आलेली जुनी बेअरिंग्ज सध्याच्या बाजारात उपलब्ध नसल्याने ती नव्याने तयार करून घ्यावी लागली. तडे गेलेल्या भागांवर ग्रूव्ह कटिंग करून इपॉक्सी, ग्राउट इपॉक्सी, कार्बन लॅमिनेट आणि फायबर रॅपिंग यांसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. तसेच पुलावरील चार सेंट्रल हिंज बेअरिंग्ज आणि आठ रोलर रॉकर बेअरिंग्ज बदलण्यात आल्या असून, जुन्या रेलिंगऐवजी नव्या रेलिंग बसविण्यात आल्या आहेत.
देशातील मोजक्या ठिकाणी वापरलेले काँक्रीट
या पुलाच्या दुरुस्तीतील सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यूएचपीसी-एफआरसी या अत्याधुनिक काँक्रीटचा वापर. अत्यंत मजबूत आणि टिकाऊ असलेल्या या विशेष काँक्रीटचा वापर देशात मोजक्या तीन ठिकाणी करण्यात आला आहे, त्यामध्ये मुंब्रा, पुणे आणि आता खोपटा पुलाचा समावेश आहे. मलेशियन तंत्रज्ञानावर आधारित या काँक्रीटमध्ये सिमेंट आणि फायबरचे प्रमाण अधिक असते. त्याची गुणवत्ता टिकवण्यासाठी बर्फाचा वापर करून रात्रीच्या वेळी काँक्रीटीकरणाचे काम करण्यात आले. पुलाच्या एकूण २६८ मीटर लांबीचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले आहे.
सध्या काँक्रीट सेट होण्याची प्रक्रिया सुरू असून, त्यासाठी आवश्यक कालावधी पूर्ण झाल्यानंतर पुलावरून वाहतूक सुरू करता येणार आहे. पूल सुरू झाल्यानंतर उरणच्या पूर्व आणि पश्चिम भागांतील नागरिक, कामगार, व्यावसायिक तसेच अवजड वाहनचालकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. पर्यायी मार्गांवरील वाहतुकीचा ताण कमी होऊन वेळ आणि इंधनाचीही बचत होणार आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply