बदलत्या पुणे जिल्ह्याचा वेध घेणारा दिवाळी विशेषांक वाचकांच्या हाती आला आहे. ‘गावगाडा ते ग्रोथ हब’ या संकल्पनेतून साकारलेल्या या अंकातून जिल्ह्याच्या विकासाचा वेग, बदलते स्वरूप, नव्या संधी, आव्हाने आणि या परिवर्तनात योगदान देणाऱ्या माणसांचा वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शिक्षणापासून उद्योगापर्यंत नवी ओळख
‘विद्येचे माहेरघर’ आणि ‘सांस्कृतिक पुणे’ अशी समृद्ध ओळख असलेल्या जिल्ह्याने विकासाच्या क्षेत्रातही मोठी झेप घेतली आहे. शिक्षण, उद्योग, माहिती तंत्रज्ञान, सहकार, शेती, पर्यटन आणि पायाभूत सुविधा या विविध क्षेत्रांत जिल्ह्याने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. परंपरा आणि आधुनिकता यांचा संगम साधत जिल्हा नव्या पर्वाकडे वाटचाल करत आहे. कालपर्यंत गावगाड्याच्या चौकटीत असलेली अनेक गावे आज औद्योगिक, व्यावसायिक आणि शहरी विकासाची केंद्रे बनत आहेत. चाकण, तळेगाव, रांजणगाव, बारामती, इंदापूर, दौंड आणि शिरूर यांसारख्या औद्योगिक पट्ट्यांनी जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला नवी दिशा दिली असून ग्रामीण तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत.
विमानतळ, रिंगरोड आणि पर्यटनाची नवी दारे
पुरंदर येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळ जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार, निर्यात, रोजगार आणि पर्यटन क्षेत्राला चालना मिळण्याची अपेक्षा आहे. पुणे रिंगरोडमुळे जिल्ह्यातील दळणवळण सुलभ होऊन शहर आणि ग्रामीण भागातील अंतर कमी होणार आहे. अलीकडेच झालेल्या ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेने जिल्ह्याला जागतिक नकाशावर नेले असून मुळशी, मावळ, जुन्नर, भोर आणि राजगड परिसरात पर्यटनाच्या नव्या शक्यता निर्माण झाल्या आहेत. शेतीतही बदलत्या हवामानाचा सामना करत शेतकरी नवे तंत्रज्ञान, आधुनिक सिंचन पद्धती आणि कृषी प्रक्रिया उद्योग स्वीकारत आहेत. मावळातील ऐतिहासिक घराणी, वाडे, ग्रामदैवतांच्या यात्रा, वारकरी परंपरा, अष्टविनायक क्षेत्रे, ज्योतिर्लिंगे, लोककला आणि आदिवासी संस्कृती यांनी जिल्ह्याची सांस्कृतिक ओळख समृद्ध केली आहे. या अंकात गावांमध्ये जाऊन केलेले रिपोर्ताज, विकासाच्या नव्या वाटा, शेतीतील प्रयोग, प्रेरणादायी यशोगाथा आणि सांस्कृतिक जीवनाचे दर्शन घडवण्यात आले आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply