वाढत्या शहरीकरणाच्या काळातही नाशिकमध्ये निसर्गासाठी स्वतंत्र जागा जपण्याचे प्रयत्न सुरू आहेत. त्या प्रयत्नांना आता पक्ष्यांच्या वाढत्या वास्तव्यामुळे यश येताना दिसत आहे. नाशिक देवराईने अकरा वर्षे पूर्ण करून बाराव्या वर्षात प्रवेश केला आहे, तर नाशिक वनराईने दहा वर्षे पूर्ण करून अकराव्या वर्षात पाऊल ठेवले आहे. दोन्ही ठिकाणी वृक्ष, वनस्पती, झुडपे आणि नैसर्गिक अधिवास विकसित झाल्याने ५५ ते ६० प्रजातींचे पक्षी दिसत आहेत आणि वास्तव्य करत आहेत. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने नाशिकची ही निसर्गसमृद्धी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
शंभर एकरात पसरलेल्या देवराईमध्ये स्थानिक वृक्षसंपदा आणि नैसर्गिक अधिवास बहरत आहेत. दुसरीकडे, सुमारे ५५ एकर क्षेत्रातील नाशिक वनराईमध्येही वृक्ष, झुडपे, जलस्रोत आणि विविध वनस्पतींमुळे जैवविविधतेला पोषक वातावरण तयार झाले आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या संवर्धनाच्या प्रयत्नांचे परिणाम आता पक्ष्यांच्या वाढत्या संख्येतून दिसू लागले आहेत.
कोणत्या पक्ष्यांची नोंद झाली?
या परिसरात शृंगी घुबड, वनपिंगळा, पिंगळा, सर्पगरुड, स्वर्गीय नर्तक, शिपाई बुलबुल, चातक, इजिप्शियन स्कूप्स घुबड, ठिपक्या कवडा, रातवा, रानखाटीक, सुभग, लाल मनोली, युवराज, काळ्या डोक्याचा सराटी, पट्टकादंब आणि चकवा अशा वैशिष्ट्यपूर्ण पक्ष्यांची नोंद झाली आहे. नाशिक वनराईमध्ये विविध जलचर पक्ष्यांचेही दर्शन घडत आहे. त्यामुळे या परिसरातील जलस्रोत पक्ष्यांसाठी अनुकूल अधिवास ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे.
केवळ वृक्षारोपण नव्हे, अधिवासनिर्मिती महत्त्वाची
पक्ष्यांचे वास्तव्य निर्माण होण्यासाठी केवळ झाडे लावणे पुरेसे नसते. स्थानिक वृक्ष, फळझाडे, फुलझाडे, झुडपे, कीटक, पाण्याचे स्रोत आणि सुरक्षित अधिवास यांची नैसर्गिक साखळी विकसित होणे आवश्यक असते. नाशिक देवराई आणि वनराईमध्ये ही साखळी हळूहळू समृद्ध होत असल्याने पक्ष्यांसह अन्य जीवसृष्टीही आकर्षित होत आहे. पक्ष्यांची वाढती उपस्थिती ही निसर्गसंवर्धनाच्या प्रयत्नांना मिळालेली पावतीच आहे. पक्षी सप्ताहाच्या निमित्ताने केवळ पक्ष्यांची ओळख करून न घेता त्यांच्या अधिवासाचे संरक्षण करण्याची जाणीव निर्माण होणे गरजेचे आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply