घरातील स्वयंपाकघर म्हणजे फक्त जेवण बनवण्याची जागा नाही. वास्तुशास्त्रानुसार स्वयंपाकघराला घरातील सकारात्मक ऊर्जेचे महत्त्वाचे केंद्र मानले जाते. स्वयंपाकघरातील प्रत्येक वस्तूला विशेष महत्त्व असल्याचे वास्तुशास्त्रात सांगितले जाते आणि यामध्ये चाकूचाही समावेश होतो. भाजी कापण्यासाठी रोज वापरला जाणारा चाकू वास्तुशास्त्रानुसार मंगळ ग्रहाचे प्रतीक मानला जातो. मान्यतेनुसार चाकू योग्य दिशा आणि योग्य पद्धतीने ठेवल्यास तो ऊर्जा आणि धैर्याचे प्रतीक ठरतो, पण चुकीच्या ठिकाणी ठेवल्यास किंवा त्याची योग्य काळजी न घेतल्यास घरात नकारात्मक वातावरण निर्माण होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते स्वयंपाकघराच्या मुख्य दरवाजाच्या वर अन्नपूर्णेचा फोटो लावावा, स्वयंपाकघर अग्नेय दिशेला असावे आणि तेथे शून्य वॅटचा लाल बल्ब लावावा, असाही सल्ला दिला जातो.
चाकू कोणत्या दिशेला ठेवावा?
वास्तुशास्त्रानुसार मंगळ ग्रहाची दिशा दक्षिण मानली जाते. त्यामुळे स्वयंपाकघरात चाकू दक्षिण किंवा दक्षिण-पूर्व दिशेला ठेवणे शुभ मानले जाते. या दिशेला चाकू ठेवल्याने व्यक्तीला स्वतःचा राग आणि ऊर्जेवर नियंत्रण ठेवण्यास मदत होते, अशी मान्यता आहे. तसेच चाकूचा वापर फक्त गरजेच्या कामांसाठीच होतो, असेही सांगितले जाते. दुसरीकडे उत्तर किंवा ईशान्य दिशेला चाकू ठेवणे शुभ मानले जात नाही. या दिशांचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो. या ठिकाणी चाकू ठेवल्यास घरातील सुख-शांतीवर परिणाम होऊ शकतो आणि कुटुंबातील सदस्यांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवरही त्याचा वाईट परिणाम होऊ शकतो, असे वास्तुशास्त्रात सांगितले जाते.
कोणता चाकू वापरावा आणि कोणती काळजी घ्यावी?
चाकू कोणत्या प्रकारचा आहे आणि त्याची रचना कशी आहे, यालाही वास्तुशास्त्रात महत्त्व दिले जाते. स्वयंपाकघरासाठी स्टीलचा चाकू सर्वात योग्य मानला जातो. चाकूचे हँडल लाकडाचे असेल तर ते अधिक शुभ मानले जाते. पण प्लास्टिकच्या हँडलचा चाकू खरेदी करताना त्याचा रंग काळा नाही ना, याची काळजी घ्यावी. काळा रंग नकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानला जातो, त्यामुळे काळ्या रंगाच्या हँडलचा चाकू वापरणे टाळण्याचा सल्ला दिला जातो. वास्तुशास्त्रानुसार चाकू कधीही उघड्यावर ठेवू नये. चाकू सतत नजरेसमोर राहिल्यास घरातील वातावरणात तणाव आणि चिडचिड वाढू शकते, अशी मान्यता आहे. त्यामुळे चाकू नेहमी ड्रॉवरमध्ये किंवा बंद जागेत सुरक्षित ठेवावा. विशेषतः स्वयंपाक झाल्यानंतर चाकू ओट्यावर उघडा ठेवू नये. चाकू वापरल्यानंतर तो स्वच्छ धुणेही महत्त्वाचे मानले जाते. वापर झाल्यानंतर लगेच चाकू धुऊन स्वच्छ जागी ठेवावा. घाण झालेला चाकू सिंकजवळ किंवा गॅस शेगडीच्या बाजूला ठेवणे शुभ मानले जात नाही; असे केल्याने आरोग्याच्या समस्या वाढू शकतात आणि विनाकारण खर्चही होऊ शकतो, अशी वास्तुशास्त्रात मान्यता आहे. ही माहिती ज्योतिषशास्त्रीय मान्यतांवर आधारित असून कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply