बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यात शृंगेरी घाटात भीषण अपघात घडला आहे. मुगाव मार्गे जाणाऱ्या घाट रस्त्यावर ऊस वाहतूक करणारा मोकळा ट्रक खोल दरीत कोसळला. हा अपघात रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडल्याची माहिती समोर आली आहे. ट्रकचा ब्रेक निकामी झाल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.
अपघातानंतर ट्रकने घेतला पेट
दरीत कोसळल्यानंतर ट्रकने अचानक पेट घेतला आणि आगीचे भयानक लोळ उठले. ट्रकच्या आगीमुळे परिसरातील डोंगरालाही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला आहे.
मदतीसाठी स्थानिक धावले
अपघाताची माहिती मिळताच मुगाव येथील युवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र ट्रक अत्यंत खोल दरीत कोसळलेला असल्याने आणि आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे घटनास्थळी पोहोचणे कठीण झाले होते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply