नाशिक शहरातील राणेनगर भागात मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण अपघातात एका ज्येष्ठ नागरिकाचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. दिवाळीच्या खरेदीची लगबग सुरू असताना घडलेल्या या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
बाजारात जाताना घडला अपघात
राणेनगर सर्व्हिस रस्त्यावरील एका हॉटेलजवळ सायंकाळी साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली. साक्षी अपार्टमेंट, चेतनानगर येथे राहणारे ६० वर्षीय रघुनाथ एकनाथ भटाटे हे पत्नीसह दुचाकीवरून बाजारात निघाले होते. त्याचवेळी एका पेट्रोलियम कंपनीच्या टँकरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडकेनंतर दोघेही रस्त्यावर कोसळले आणि टँकरचे चाक भटाटे यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पत्नीला गंभीर दुखापत झाली असून त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांकडून वाहतूक सुरळीत, गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू
अपघाताची माहिती मिळताच इंदिरानगर पोलिस घटनास्थळी पोहोचले. अपघातामुळे परिसरात वाहतुकीची कोंडी झाली होती, ती पोलिसांनी नियंत्रणात आणून वाहतूक सुरळीत केली. भरवस्तीत अवजड वाहनाच्या धडकेत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याने नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे. रात्री उशिरापर्यंत इंदिरानगर पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply