दिवाळीत फटाक्यांच्या आतिषबाजीमुळे निर्माण होणारा धूर आणि वायुप्रदूषण श्वसन तसेच हृदयविकार असलेल्या रुग्णांसाठी त्रासदायक ठरू शकते. विशेषतः दमा, सीओपीडी, सायनस आणि फुप्फुसांचे विकार असलेल्या व्यक्तींना खोकला, घशात खवखव, धाप लागणे, श्वास घेताना घरघर आणि छातीत जडपणा जाणवण्याचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे फटाक्यांच्या धुरापासून दूर राहून आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
सूक्ष्म कणांमुळे श्वसनमार्गाला सूज
फटाके जळताना सूक्ष्म प्रदूषक कण आणि विविध घातक वायू हवेत मिसळतात. यामुळे श्वसनमार्गाला सूज येऊन ते अधिक संवेदनशील होतात. आधीपासून दमा किंवा फुप्फुसांचा आजार असलेल्या रुग्णांमध्ये त्याचा परिणाम अधिक तीव्र होऊ शकतो. खोकला, धाप वाढणे, छातीत जडपणा किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष न करता वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक आहे.
हृदयविकार, मुले आणि गर्भवती महिलांनी घ्यावी दक्षता
वायुप्रदूषणाचा परिणाम फुप्फुसांबरोबरच हृदयावरही होतो. प्रदूषित हवेमुळे शरीरातील दाह वाढून रक्तवाहिन्यांवर ताण येऊ शकतो, त्यामुळे हृदयविकार असलेल्या रुग्णांच्या तक्रारी वाढण्याची शक्यता असते. अशा रुग्णांनी धुराचा थेट संपर्क टाळावा, डॉक्टरांनी सांगितलेली औषधे नियमित घ्यावीत आणि शक्यतो प्रदूषण कमी असलेल्या वातावरणात राहावे. लहान मुलांची श्वसनसंस्था विकसित होत असल्याने त्यांच्यावर प्रदूषणाचा परिणाम अधिक होऊ शकतो, तर गर्भवती महिलांनीही फटाक्यांच्या धुराच्या थेट संपर्कात अधिक वेळ राहणे टाळावे. मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावत असताना खोकला, घशात खवखव आणि धाप लागणे अशा तक्रारींच्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे.
स्रोत: मूळ बातमी
Leave a Reply